जळगाव - तालुक्यातील आसोदा हे गाव ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर आहे. बहिणाबाईंमुळे हे गाव राज्यच नव्हे तर देशाच्या नकाशावर झळकले आहे. परंतु, गावातील ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधादेखील मिळत नसल्याचे चित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ऐन हिवाळ्यात या गावात भीषण पाणीटंचाई भासत आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असताना केवळ राजकारण्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई भासत आहे. सद्यस्थितीत 20 ते 25 दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महिलावर्गाला द्यावे लागते असंख्य अडचणींना तोंड
जळगाव शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आसोदा हे गाव वसलेले आहे. सुमारे 25 ते 30 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला बहिणाबाई चौधरी यांच्यामुळे विशेष अशी ओळख मिळाली आहे. परंतु, या गावात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून सातत्याने पाणीटंचाई भासत आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून वार्षिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. असे असताना आसोद्यात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई आहे. ग्रामपंचायतीकडून सद्यस्थितीत 20 ते 25 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. कधी कधी तर पाणी योजनेची जलवाहिनी फुटली किंवा विद्युत पंप, इलेक्ट्रिक यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला तर महिनाभर नळांना पाणी येत नाही. अशा वेळी ग्रामस्थांना विशेष करून महिलावर्गाला असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते.
दिवस उजाडला की पाण्याचीच चिंता
आसोद्यातील पाणीटंचाई संदर्भात बोलताना आशा चौधरी म्हणाल्या की, मी लग्न करून या गावात सून म्हणून आले, तशी मला पाण्याची समस्या दिसत आहे. अनेक वर्षे लोटली पण ही समस्या जैसे-थे आहे. दिवस उजाडला की पाण्याचीच चिंता सतावते. नळांना 20 ते 25 दिवस पाणी येत नाही. आता तर चांगला पाऊस पडूनही हिवाळ्यात पाणीटंचाई भासत आहे. पुढे उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल, याचा विचार न केलेला बरा. गावात किमान दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नळांना पाणी यायला हवे. पण ग्रामपंचायत काहीही उपाययोजना करत नाही. पाण्याअभावी महिलावर्गाची खूप अडचण होते. लहान-लहान मुले, वयोवृद्ध महिला डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करतात. आसोदा गाव म्हणजे 'नाव मोठं पण लक्षण खोटं' असा प्रकार असल्याची खंत आशा चौधरी यांनी व्यक्त केली.
इथे प्यायला पाणी नाही, शौचालयाचा वापर करायचा तरी कसा?
पाण्याच्या समस्येबाबत बोलताना सुनिता चौधरी म्हणाल्या, आसोदा गावात खूप पाणीटंचाई आहे. 20-20 दिवस नळांना पाणी येत नाही. आले तरी ते अशुद्ध आणि गढूळ असते. पाण्याअभावी रोज अडचणींना सामोरे जावे लागते. एकीकडे शासन म्हणते की वैयक्तिक शौचालयांचा वापर करा. पण आमच्या गावात वेळेवर प्यायला पाणी मिळत नाही, तर शौचालयांचा वापर कसा करायचा? पाणी नसल्याने आम्हाला नाईलाजाने उघड्यावर शौचालयाला जावे लागते. खूप संकोच वाटतो. ग्रामपंचायतीने किमान पाण्याची तरी समस्या सोडवली पाहिजे, अशी मागणी सुनिता चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
5 कोटींची पाणीयोजना कागदावरच
गावातील नागरिक किशोर चौधरी यांनी पाणी योजनेच्या कामावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, आसोद्यासाठी सन 2011-12मध्ये 5 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेच्या माध्यमातून तापी नदीवर असलेल्या शेळगाव बॅरेजमधून जलवाहिनीद्वारे गावात पाणी पोहचणार होते. पण ही योजना कागदावरच राहिली. या योजनेतून गावाच्या बाहेर एक जलशुद्धीकरण प्रकल्पही उभरण्यात आला आहे. मात्र, हा प्रकल्प 7 ते 8 वर्षे रेंगाळला. प्रकल्पाचा ठेकेदार काम सोडून पळून गेला. त्यामुळे आसोदेकरांना आजही शुद्ध पाणी मिळालेले नाही. नळांना अशुद्ध पाणीपुरवठा होतो. त्यामुळे साथीचे आजार बळावतात. ग्रामपंचायतीने पाणीप्रश्न सोडवला पाहिजे, असे किशोर चौधरी म्हणाले.
गाजणार ग्रामपंचायतीची निवडणूक
गावातील ज्येष्ठ नागरिक चिंतामण चिरमाडे म्हणाले, आसोदा गावात वर्षानुवर्षे पाण्याची समस्या आहे. राजकारणी मंडळी प्रत्येक वेळी ही समस्या सोडवण्याचे आश्वासन देते. पण काही एक उपयोग होत नाही. गेल्या वेळी कोट्यवधी रुपयांची पाणीयोजना पूर्ण झाली नाही. आताही ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. यावेळीही पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावर ग्रामपंचायतीची निवडणूक गाजणार हे नक्की. आम्हाला नुसते आश्वासन नकोय, आता ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा असल्याचे चिरमाडे यांनी सांगितले.