जळगाव - दिवाळीच्या काळात झालेल्या मूव्हमेंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच अनुषंगाने, महाराष्ट्रात खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. चार राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तेथून रेल्वे व विमानाने राज्यात येणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. परंतु, राज्याच्या सीमांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. रस्ते मार्गाने वाहनांद्वारे परराज्यातून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या लोकांकडे होणारे दुर्लक्ष कोरोनाच्या संसर्गवाढीला कारणीभूत ठरू शकते.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याची सीमा मध्यप्रदेशाला लागून आहे. याठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनांच्या तपासणीसाठी सीमा तपासणी नाका आहे. या नाक्यावर कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात होती. परंतु, कोरोनाचा संसर्ग ओसरू लागल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता प्रदान करण्यात आल्यानंतर या नाक्यावर आलबेल चित्र आहे. कोणत्याही प्रकारच्या वाहनांची तपासणी केली जात नाही. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर, कटनी या शहरांमधून येणाऱ्या लोकांसह, महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून तिकडे जाणाऱ्या लोकांचे प्रमाण मोठे आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या ठिकाणी वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याची गरज आहे.
परिस्थितीनुसार होईल निर्णय - राधाकृष्ण गमे
नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे हे बुधवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी राधाकृष्ण गमे यांना सीमावर्ती भागातील निर्बंधांबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि गोव्यातून आपल्याकडे येणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या चारही राज्यातून रेल्वे आणि विमानाद्वारे येणाऱ्या लोकांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे अहवाल नाही, त्यांची रेल्वेस्थानक तसेच विमानतळावरच कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. यापुढच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढला तर परिस्थितीनुसार सीमावर्ती भागातील निर्बंधांचा विचार केला जाईल, असे गमे यांनी सांगितले.
गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण -
गुजरात राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तेथून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रवाशांवर सद्यस्थितीत नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. गुजरातमधून नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या मार्गे लोक जळगाव जिल्ह्यात दाखल होतात. गुजरातची परिस्थिती पाहून नंदुरबार व धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. या पुढच्या काळात गरज भासली तर स्थानिक प्रशासनाकडून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सीमावर्ती भाग सील करण्याबाबतचा निर्णय घेतील. आजच्या घडीला परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.