जळगाव - जिल्ह्यात वाळू माफियांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. जिल्हाभरात दररोज कुठेतरी अवैध वाळू वाहतुकीशी निगडित एखादी घटना घडते. मंगळवारी दुपारी देखील एक थरारक घटना पाचोरा शहराजवळ घडली. कोविड केअर सेंटरच्या पाहणीसाठी निघालेले पाचोरा येथील प्रांताधिकाऱ्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, प्रांताधिकाऱ्यांना पाहून भरधाव ट्रॅक्टर चालकाने धावत्या ट्रॅक्टरवरून उडी घेत पळ काढला. सुदैवाने ट्रॅक्टर वेळीच थांबवल्याने मोठा अनर्थ टळला.
पाचोऱ्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे हे आज दुपारी त्यांच्या शासकीय वाहनाने तालुक्यातील बांबरुड येथील कोविड केअर सेंटरच्या पाहणसाठी जात होते. पाचोरा-भडगाव रस्त्यावर त्यांना विना क्रमांकाचे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिसले. त्यांनी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबण्यासाठी हात दिला. तसेच आपल्या वाहनावरील ध्वनिक्षेपकावरून ट्रॅक्टर थांबविण्याची सूचना दिली. यावेळी ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूने पुनगाव रस्त्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ट्रॅक्टर उतरवले. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर चालकाने धावत्या ट्रॅक्टरवरून उडी घेत पळ काढला. वाळूने भरलेले ट्रॅक्टर चालकाविना धावत राहिले. पुढे शंभर मीटरवर असलेल्या घरासमोर काही मुले खेळत असल्याचे पाहून प्रांताधिकारी कचरे यांच्या गाडीचे चालक अजिजबेग मिर्झा यांनी वाहन रस्त्याखाली उतरून थांबविले. यानंतर पळत जाऊन चालकाविना धावणाऱ्या ट्रॅक्टरवर चढून ब्रेक लावून ते थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्रांताधिकाऱ्यांनी दाखल केला चालकाविरूद्ध गुन्हा-
याप्रकरणी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. दरम्यान हा प्रकार सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यावर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याच्या अफवा पसरल्या. या घटनेत प्रांताधिकारी कचरे यांचे चालक अजिजबेग मिर्झा यांना खरचटले असून त्यांचा एक्स-रे काढून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिसांनी या ट्रॅक्टरमधील वाळू घटना स्थळीच टाकून ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे.