जळगाव - जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या अमळनेरमध्ये २०० वर्षाची परंपरा लाभलेल्या संत सखाराम महाराज यांच्या यात्रोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने रविवारी सकाळी ६ वाजता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लालजींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी अलोट जनसागर उसळला होता.
सालाबादाप्रमाणे यावर्षीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अमळनेर येथील वाडी संस्थानाच्या वतीने संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव सुरू झाला आहे. बोरी नदीच्या विस्तीर्ण पात्रात यात्रा भरली आहे. अक्षय्य तृतीयेपासून सुरू झालेला यात्रोत्सव तब्बल १५ दिवस चालतो. या यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. रथोत्सवानंतर पौर्णिमेला श्री लालजींच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
टाळ-मृदुंगांचा गजर, कानावर पडणारे वारकऱ्यांचे अभंग गायन अशा हर्षोल्हासात श्री लालजींची पालखी निघाली. पालखीच्या आधी छोटा रथ, भालदार-चोपदार, लेझीम मंडळे, तर मागे संत सखाराम महाराजांच्या पादुका होत्या. वाडी संस्थानचे गादीपती ह.भ.प. प्रसाद महाराज हे देखील तप्त उन्हात अनवाणी पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते. सकाळी ६ वाजता विधिवत पूजन करुन वाडी संस्थानापासून पालखी निघाली. त्यानंतर नागरिकांच्या घरी तीर्थ प्रसादासाठी पालखी थांबली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
अमळनेरच्या संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव हा हंगामातील सर्वात शेवटचा यात्रोत्सव मानला जातो. या यात्रोत्सवानंतर संपूर्ण राज्यातील यात्रोत्सव बंद होतात. त्यामुळे या यात्रोत्सवाला महत्व आहे.