जळगाव - खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, जिल्हा बँक व ग्रामीण बँक मिळून एकूण उद्दिष्टांच्या केवळ १३ टक्केच पीककर्ज वाटप झालेले आहे. हाती पैसा नसल्याने बी-बियाणे, रासायनिक खते, फवारणीची औषधी खरेदी कशी करावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. बँकांनी कर्ज वाटपात हात आखडता घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जळगाव जिल्ह्यात सन २०१९-२० खरीप हंगामासाठी सर्व बँका मिळून २९३६ कोटी ८१ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, १५ जूनअखेर सर्व बँका मिळून ७० हजार १५४ शेतकरी सभासदांना ३८१०४.१८ लाख रुपयांचेच पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ १२.९७ टक्के पीककर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे. वेगवेगळी कारणे देऊन पीक कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असल्याने बँकांनी पीककर्ज देताना सकारात्मक धोरण अवलंबावे. शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही. कोणीही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचा इशारा शासनाने दिला असला तरी बँका जुमानत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून पेरणी उरकली आहे. मात्र, खते, फवारणीची औषधी घेण्यासाठी पैसा नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. बँकांनी कर्जासाठी अडवणूक करू नये, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
ज्या बँका विनाकारण शेतकऱ्यांची कर्जासाठी अडवणूक करतील, त्यांच्यावर कारवाईसाठी रिझर्व्ह बँकेला अहवाल पाठवण्याचा इशारा मध्यंतरी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बँक सल्लागार समितीच्या बैठकीत दिला होता. मात्र, तरीही बँकांची मुजोरी थांबलेली नाही. यावर्षी राष्ट्रीयकृत बँकांना खरीप हंगामात १३६१ कोटी ९७ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आहे आहे. या बँकांनी १५ जूनअखेर एकूण उद्दिष्टाच्या केवळ २०.४३ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. तर ग्रामीण बँक २२.८८ टक्के तर, खासगी बँकांनी १४.५१ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार शेतकरी सभासदांना सुमारे २५७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
जिल्ह्यात बहुतांश शेतकरी थकबाकीदार असल्याने त्यांना पीककर्ज मिळालेले नाही. दीड लाखावर थकबाकी न भरणारे शेतकरीही पीककर्जापासून वंचितच आहेत. त्याचबरोबर पात्र असूनही शासनाच्या कर्जमाफीचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. बँका कर्जासाठी उभे करत नसल्याने आता शेतकऱ्यांवर पुन्हा खासगी सावकारांच्या पाय धरण्याची वेळ आली आहे.