जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 169 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 5471 इतकी झाली आहे. शुक्रवारी देखील जिल्ह्यातील 6 जणांचा कोरोनाने बळी घेतला.
जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 73, जळगाव ग्रामीण 16, भुसावळ 13, अमळनेर 9, चोपडा 13, पाचोरा 4, भडगाव 4, धरणगाव 6, यावल 7, एरंडोल 1, जामनेर 10, रावेर 8, चाळीसगाव 4, बोदवड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे मुख्य हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळून येत आहेत.
शुक्रवारी देखील जळगाव शहरात जिल्ह्यात सर्वाधिक 73 रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत एकट्या जळगावात 1 हजार 272 इतके रुग्ण आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जळगावात आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक 59 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 5471 रुग्ण आढळले असून, सद्यस्थितीत 1933 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 183 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. समाधानाची बाब म्हणजे, 3223 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी 144 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 315 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात कोविड रुग्णालयात सर्वाधिक 231 जणांचा तर गणपती हॉस्पिटलमध्ये 5, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये 51, गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये 3, जामनेर 1, पाचोरा 3, चोपडा 2, चाळीसगाव 2 आणि अमळनेर येथे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 15 रुग्ण हे मृतावस्थेत रुग्णालयात दाखल झालेले होते.