जळगाव - मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे मोलमजुरीसाठी आलेल्या एका 60 वर्षाच्या वृद्धाचा अज्ञातांनी शिरच्छेद करून निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भिका दयाराम पाटील (रा. जुनोना, ता. भुसावळ) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
कासारखेडा शिवारातील एका केळीच्या शेतात भिका पाटील यांचा मृतदेह सापडला. ते गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी चांगदेव येथे वास्तव्याला होते. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते.
खून करणाऱ्या आरोपींनी मृत व्यक्तीचे पाय बांधले होते. तसेच शिरच्छेद करून मुंडके धडापासून लांब अंतरावर फेकण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांना घटनास्थळी कोणतेही पुरावे न आढळल्याने पुढील तपास सुरू आहे.