जळगाव - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज(शुक्रवारी) होत आहे. दोन्ही पदांसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दुपारी तीन वाजल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्याचे संख्याबळ लक्षात घेता भाजपचे पारडे जड असून जिल्हा परिषदेत पुन्हा भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे.
भाजपकडून अध्यक्षपदासाठी ऐनपूर-खिरवड गटाच्या रंजना प्रल्हाद पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांना सूचक म्हणून नंदा पाटील आणि जयपाल बोदडे आहेत. तर उपाध्यक्षपदासाठी लालचंद पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. ते नशिराबाद भादली गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे सूचक म्हणून अनिल देशमुख आणि मधु काटे यांनी अर्ज भरला आहे.
हेही वाचा - लोक आयुक्त कायदा केवळ नावापुरताच; माहिती अधिकारात 'पर्दाफाश'
महाविकास आघाडीच्यावतीने अध्यक्षपदासाठी लोहारा-कुऱ्हाड गटाच्या सदस्या रेखा दीपकसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला. नानाभाऊ महाजन आणि मनोहर पाटील हे त्यांना सूचक आहेत. तर उपाध्यक्षपदासाठी अमळनेर तालुक्यातील कळमसरे-जळोद गटाच्या सदस्या जयश्री पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांना सूचक म्हणून नीलम पाटील आणि स्नेहा गायकवाड आहेत.