जळगाव - पावसाळ्याला सुरुवात होऊनही शहरात नालेसफाई झालेली नाही. नालेसफाई करण्यासंदर्भात नगरसेवकांसह नागरिकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाला लेखी तसेच तोंडी निवेदने दिली. मात्र, बेफिकीर असलेल्या महापालिका प्रशासनाला अद्याप नालेसफाईचा मुहूर्त गवसलेला नाही. आता मुसळधार पाऊस आला तर, नाल्यांच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे.
जळगाव शहरात ठिकठिकाणी मोठे नाले आहेत. महापालिका प्रशासनाच्या वतीने नालेसफाई होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांना पूर येऊन नाल्यांच्या काठावर असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरते. दोन वर्षांपूर्वी शहरातील लेंडी नाल्याला मोठा पूर येऊन घरांचे मोठे नुकसान झाले होते. हा पूर्वानुभव लक्षात घेता यावर्षी काही सुज्ञ नागरिकांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई करण्याची विनंती महापालिका प्रशासनाकडे केली होती. हाच विषय काही नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या महासभेतही उपस्थित केला होता. त्यावेळी प्रशासनाने 7 जूनपूर्वी शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता 15 जून उलटून देखील प्रत्यक्षात नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. नगरसेवकांच्या विनंतीला महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी जुमानत नसल्याची स्थिती आहे.
यावर्षी महापालिका प्रशासनाने 15 जून उलटूनही नालेसफाईला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका दरवर्षी नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. नालेसफाईबाबत सातत्याने तक्रारी करणाऱ्या नागरिकांना आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी धमकावत असल्याचाही आरोप होत आहे. नालेसफाई करण्यासाठी तक्रारी वाढल्या की महापालिका प्रशासन वरवर सफाई केल्याचा आव आणते. मात्र, त्याचा काहीएक उपयोग होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
मान्सून महाराष्ट्रात कधीही दाखल होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. त्याआधीच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी देखील लावली आहे. मात्र, तरीही महापालिका प्रशासनाला जळगाव शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यासाठी मुहूर्त मिळत नाही, ही खेदाची आणि संतापजनक बाब आहे. आता अचानक मुसळधार पावसाने नाल्यांना पूर आला तर होणाऱ्या नुकसानीला महापालिका जबाबदार असेल, हे निश्चित.