जळगाव - संचालक मंडळाला विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा आरोप करत जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १५ सदस्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रस्ताव गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून लक्ष्मण पाटील यांची कारकीर्द उत्तम असताना त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. लक्ष्मण पाटील यांनी बाजार समितीच्या कारभारात सुसूत्रता आणून बाजार समितीचा चेहरामोहरा बदलला. मात्र, अचानक असा प्रकार का घडला याचे कारण समजत नसल्याची प्रतिक्रिया पाटील यांच्या बाजूने असलेल्या संचालकांनी व्यक्त केली. आता पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव पारित होतो किंवा नाही, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आपला पारदर्शी कारभार होता तसेच भविष्यात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीत दावेदार होतो, म्हणून हे सगळे करण्यामागे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप सभापती लक्ष्मण पाटील यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना बाजार समितीचे सचिव रमेश माळी यांना गुलाबराव पाटलांनी अविश्वास ठरावाचे प्रोसिडिंग देण्याबाबत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिपदेखील सभापती पाटील यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली. ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे.