जळगाव - मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे विना परवाना बसवलेला पुतळा पोलीस प्रशासन हटवत असतांना काही जणांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. या घटनेत गावातील ५७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
दोन पोलीस जखमी -
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे मंगळवारी पुतळा बसण्यावरून वादंग निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलिस पोहोचताच पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली होती. यात दोन पोलीस जखमी झाले होते.
मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल-
दरम्यान, दगडफेक करणार्या नऊ जणांवर रात्री मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधान कायदा कलम ३५३,३३२,३३३,३२४,१४१,१४३ तसेच १४७ व १४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दीपक डहाके, गजानन डहाके, अतुल डहाके, मंगेश मराठे, देवेंद्र डहाके, कैलास डहाके, अरविंद लोमटे, मंगल करदळे आदींचा समावेश आहे. तर, याच प्रकरणात ५७ जणांवर जमाबंदी च्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून १३५ नुसार ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयितांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक निलेश साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील करत आहेत.