जळगाव - 'समाजाचे आपण काही देणं लागतो', या उदात्त भावनेतून जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेलवडच्या जंजाळ परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे. लॉकडाऊनच्या काळात अगदी साध्या पद्धतीने लग्न करत त्यांनी वाचलेल्या खर्चातून कोरोना लढ्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीत 11 हजार 111 रुपयांची मदत केली आहे. जंजाळ परिवाराच्या या निर्णयाचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे.
शेलवड येथील जंजाळ परिवारातील वर आणि बाविस्कर परिवारातील वधूचा विवाह नुकताच पार पडला. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात पारंपरिक रुढी व परंपरांना फाटा देत दोन्ही परिवारांनी लग्नावरील अनावश्यक खर्च टाळला. लग्न अगदी साध्या पद्धतीने 'फिजिकल डिस्टन्सिंग'चे सर्व नियम पाळत पार पडले.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकार शक्य ते प्रयत्न करत आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जंजाळ आणि बाविस्कर परिवारांनी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही परिवारातील मोजकेच वऱ्हाडी लग्नाला उपस्थित होते. लग्नाच्यावेळी सर्वांना मास्क, सॅनिटायझर तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
समाजासमोर आदर्श-
पारंपरिक रुढी व परंपरांना फाटा देत जंजाळ आणि बाविस्कर परिवारांनी साध्या पद्धतीने लग्न करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची आपत्ती लक्षात घेऊन लढा देण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना हातभार म्हणून वाचलेल्या खर्चातून पंतप्रधान सहाय्यता निधीतही मदत केली. मदतीच्या रकमेचा धनादेश लग्न सोहळ्यानंतर लगेचच बोदवड तालुक्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी वधू-वरांसह दोन्ही परिवारातील सदस्य उपस्थित होते. तहसीलदार हेमंत पाटील यांनी दोन्ही परिवारांचे अभिनंदन केले