जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 385 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात जळगावात सर्वाधिक 73 तर एरंडोलमध्ये 71 रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी पुन्हा 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या आता 576 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढल्यानंतर रुग्णांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांनुसार जिल्ह्यात तब्बल 385 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक 73 रुग्ण जळगाव शहरातील आहेत. तर यांच्या खालोखाल एरंडोल तालुक्यात तब्बल 71 बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
जळगाव ग्रामीण 14, भुसावळ 18, अमळनेर 38, चोपडा 32, पाचोरा 32, भडगाव 7, धरणगाव 38, यावल 4, जामनेर 32, रावेर 3, पारोळा 4, चाळीसगाव 15, बोदवड 2 आणि इतर जिल्ह्यातील 2 असे रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 766 इतकी झाली आहे.
शहरात वाढलेला संसर्ग मध्यंतरी थोडा कमी झाला होता. तथापि, यात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. तर हाच प्रकार एरंडोलमध्येही आढळून आला आहे. मध्यंतरी येथे काही दिवस खूप कमी प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण होते. मात्र, पुन्हा एरंडोल तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे.