जळगाव - भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभर संतप्त पडसाद उमटत आहेत. जळगावात आज (गुरुवार) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भाजप आणि पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांचा मार देत त्याचे दहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळ हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, सचिव अॅड. कुणाल पवार यांनी केले. भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (बुधुवार) पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकारानंतर पडळकर यांच्याविरुद्ध राज्यभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध निषेध आंदोलने केली जात आहेत.
गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांचा मार देऊन त्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात एकमेकांशी मतभेद असू शकतात. परंतु, कोणावरही टीका करताना राजकारणाची पातळी सोडणे, या गोष्टीचे कोणीही समर्थन करणार नाही. भाजप नेत्यांकडून वेळोवेळी शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही असे उद्योग सुरू आहेत. गोपीचंद पडळकर यांचा बोलविता धनी वेगळा आहे. शरद पवारांवर टीका-टिप्पणी होणं, ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही. भाजप नेत्यांनी हे उद्योग बंद केले नाही तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा अभिषेक पाटील यांनी दिला.
पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू आहे. अशा परिस्थितीत आंदोलन करणे, मोठ्या संख्येने एकत्र येणे याला बंदी आहे. मात्र, असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे काम जिल्हापेठ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होते.