जळगाव - शहरातील नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आमदार सुरेश भोळे आपले अपयश लपविण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांवर खापर फोडत आहेत. त्यामुळे अकार्यक्षम आमदारामुळे शहराचे वाटोळे होत असल्याचा आरोप करत कार्यक्षम आमदार उधार देण्याची मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलने केली आहे. यासंदर्भात बुधवारी काव्यरत्नावली चौकात आंदोलन करण्यात आले. तसेच आमदारांनी मनपा अधिकाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी ‘उधार पाहिजे, उधार पाहिजे, कार्यक्षम आमदार उधार पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांना मेल पाठवून कार्यक्षम आमदार देण्याची मागणी -
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेल करून शहरासाठी कार्यक्षम आमदार देण्याची मागणी केली आहे. मनपाचे अधिकारी, मक्तेदार आमदार भोळे यांचे काहीही ऐकत नाहीत. त्यामुळे आमदारांकडून सर्वसामान्य जनतेला काहीही अपेक्षा नाहीत. त्यामुळे या शहरातील समस्या मार्गी लावतील, असा कार्यक्षम आमदार शहरासाठी उधार द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांनी केली आहे.
भाजपने अघोरी पद्धतीने मिळवले यश -
भाजपने निवडणुकीच्या काळात शहरासाठी २०० कोटी रुपयांचा निधी आणून चेहरा-मोहरा बदलण्याची खोटी आश्वासने देवून अघोरी पद्धतीने यश मिळवले. मात्र, आमदार निधी न आणता, नागरिकांचे कामे न करता स्वत:चे अपयश लपविण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांवर खापर फोडत आहेत, असा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच शहरासाठी कार्यक्षम आमदाराची गरज असून आता उधारीवरच आमदार मिळवू, असेही यावेळी सांगण्यात आले.
आंदोलनामध्ये नगराध्यक्ष नामदेव चौधरी, अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी देशमुख, महिला प्रदेश उपाध्यक्ष मंगला पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख लिलाधर तायडे, महिला शहराध्यक्षा ममता सोनवणे, विजय पाटील, योगेश देसले, वाय.एस.महाजन, आशा येवले, युगल जैन यांच्यासह अनेक महिला व युवक पदाधिकारी सहभागी झाले.