जळगाव - जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरूच आहे. भाजपकडून या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून तथा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी उमेदवार देण्यापूर्वी विचारपूर्वक पावले टाकत आहे. रावेरसाठी खडसेंचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांना गळाला लावण्याच्या हालचाली राष्ट्रवादीकडून सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेत युती झाली असली तरी जळगाव जिल्ह्यात या दोन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता नाही. युती होण्यापूर्वी भाजपने वेळोवेळी सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. हा भूतकाळ विसरण्यास शिवसैनिक तयार नाहीत. तसेच विधानसभा निवडणुकीत युती तोडण्याची घोषणा करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही सेना संपवण्याची भाषा अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळे आता शिवसैनिक खडसे परिवारातील उमेदवाराचे काम न करण्याच्या मानसिकतेत आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी तशी प्रतिक्रिया जाहीरपणे दिली आहे. भाजप आणि सेनेतील या वादाचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी पुढे सरसावली आहे. एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटील यांना रावेरातून उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे पाटील यांना आपल्या गोटात दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्नशील आहे.
खडसेंच्या अडचणी वाढणार-
सेनेचे चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले तर खडसेंच्या अडचणी वाढणार आहेत. कारण रावेर लोकसभा मतदारसंघात पाटील यांचा जनसंपर्क दांडगा आहे. शिवाय त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बळ मिळेल. एकनाथ खडसे यांच्या विरोधात असलेल्या भाजपमधील दुसऱ्या गटातील असंतोषाचा फायदा चंद्रकांत पाटील यांना होऊ शकतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांच्या विरोधात पाटील हे थोड्या फरकाने पराभूत झाले होते. आताही रक्षा खडसेंना ते कडवे आव्हान देऊ शकतात. ही शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादी त्यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहे.