जळगाव - जळगावच्या राजकारणात राष्ट्रवादी-शिवसेना वाद ( NCP-Shiv Sena Dispute in Jalgaon ) उफाळून आला आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील ( Shivsena MLA Chandrakant Patil ) यांनी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याविरोधात नुकतीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) यांनी चंद्रकांत पाटलांच्या समर्थकांचे सर्वत्र अवैध धंदे असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी महिलांचा विनयभंग करून धमकावले असून ते माझ्याही अंगावर धावून आले, असा गंभीर आरोप रोहिणी खडसे-येवलकर यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) व त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर ( Rohini Khadse ) यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil Allege on Eknath Khadse ) यांनी केला होता. तसेच मागील दोन वर्षांपासून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी नाव न घेता केला. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली. चंद्रकांत पाटलांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीदेखील प्रत्यूत्तर दिले आहे. 'मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत. आमच्या तक्रारीनंतर आता पोलीस कारवाई सुरू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. यातूनच ते निरर्थक आरोप करत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
आमदारावर गंभीर आरोप -
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ड्रायव्हरने 'त्या' महिलेशी अश्लील भाषेत संभाषण केले. त्याची ऑडिओ क्लीप्स आपल्याकडे आहेत. यातील एका क्लीपमध्ये महिलेच्या नवर्यास तो व्यक्ती त्याच्या पत्नीला आमदारांकडे पाठविण्याचे स्पष्टपणे सांगत आहे. यामुळे आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ड्रायव्हरची एका महिलेसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल ( Viral Audio Clip ) झाली होती.
शिवसैनिकांकडून महिलांचा विनयभंग! -
काही शिवसैनिकांनी महिलांचा विनयभंग करून त्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप रोहिणी खडसे-येवलकर यांनी केला आहे. तसेच आपण त्या ठिकाणी गेले असता ते आमच्या अंगावरही धावून आले. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडलेला आहे. त्याचप्रमाणे बोदवड येथे देखील माझ्या अंगावर शिवसेनेचे पदाधिकारी धावून आले होते. त्यामुळे मतदारसंघात दहशतीचे वातावरण असून महिला सुरक्षित नसल्याचा आरोप त्यांनी केला.