जळगाव - सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपाच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले. त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरू आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज जळगावात केला.
हेही वाचा - महाविकास आघाडीच्या बाजूने कौल आल्यानेच अशा कारवाया - आ. रोहित पवार
आमदार रोहित पवार हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात दुपारी दीड वाजता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
'ईडी व सीबीआयचा राजकारणासाठी गैरवापर'
पवार म्हणाले, की विरोधकांकडून सीबीआयचा राजकारणासाठी सर्रास गैरवापर सुरू आहे. हा प्रकार फक्त आपल्या राज्यातच नाही तर राज्याबाहेरही सुरू आहे. कुठल्यातरी एखाद्या नेत्याचे नाव खराब करण्यासाठी विरोधकांकडून ईडी व सीबीआयचे हत्यार वापरले जात आहे. राजकीय हेतूनेच हा प्रकार होत आहे, असे सांगत आमदार पवारांनी, भाजपाने असा काही प्रकार आणलाच तर आपण कार्यकर्ता म्हणून त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. त्यानंतर जनतेसमोर वस्तुस्थिती मांडायला हवी, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
'विरोधक शब्दही काढत नाहीत'
आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य केले. गेल्या दोन वर्षांच्या काळात विरोधकांनी फक्त राजकारण केले. आजही राज्याचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. एवढेच काय, तर जीएसटी परताव्याचे 35 हजार कोटी रुपये केंद्राकडे अडकले आहेत. राज्य सरकारचा हा हक्काचा पैसा अजून केंद्राकडून मिळालेला नाही. हा पैसा मिळवण्यासाठी विरोधकांनी साधे एक पत्र तरी केंद्राला लिहिले आहे का? ते या विषयासंदर्भात एक शब्दही काढायला तयार नाहीत. केंद्राच्या अखत्यारीतील ओबीसी व मराठा आरक्षणासारखे प्रश्न प्रलंबित असताना विरोधक त्याबाबत बोलायला तयार नाहीत. राज्यातील असंख्य प्रश्न प्रलंबित असताना विरोधक लोकांची फक्त दिशाभूल करून लक्ष विचलित करण्याचे काम करत असल्याची टीकाही आमदार पवारांनी केली. केंद्राकडे जीएसटीचे 35 हजार कोटी रुपये अडकलेले असताना राज्य सरकारने अधिकचे कर्ज घेतले. राज्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार केले. शेतकरी, मजूर, व्यापारी तसेच इतर घटकांना मदतीचा हात दिला. कोरोना काळात आर्थिक ताण असतानादेखील राज्य सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - कोल्हापूर : नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याचे मी स्वागत करतो - रोहित पवार
संताप अनावर
पक्ष कार्यालयातील कार्यक्रम संपल्यानंतर रोहित पवार कार्यकर्त्यांच्या गराड्यात बाहेर पडत होते. त्याच वेळी काही महिला पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. याचदरम्यान, काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत होते. गर्दीमुळे धक्काबुक्की झाल्याने रोहित पवार संतापले. त्यांनी मागे वळून बेशिस्त वर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडेबोल देखील सुनावले.