जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, खडसेंनी दीड महिन्यांनी पहिल्यांदाच जिल्हा कार्यालयात बैठकीनिमित्त पाय ठेवला. या पहिल्यावहिल्या बैठकीत खडसेंसमोर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनाट्य रंगले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचा फोटो पक्षाच्या जाहिरातीतून वगळण्यात आल्याचा आरोप करत डॉ. पाटील समर्थकांनी बैठकीत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी संबंधितांनी जाहीरपणे माफी मागावी म्हणून कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा प्रकार घडला. बैठकीला माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, मनीष जैन, दिलीप सोनवणे, अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, खडसेंच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गरुड, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीची सुरुवातच नाराजीनाट्याने
बैठकीला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने एकनाथ खडसे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील हे बैठकीचे प्रास्ताविक करत असताना, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत पक्षाच्या जाहिरातीतून सतीश पाटील यांचा फोटो जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ऍड. रवींद्र पाटील यांनी झालेल्या प्रकाराबाबत जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली. यापुढे अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही दिली. परंतु, त्यानंतरही डॉ. पाटील समर्थकांनी हा प्रकार करणाऱ्यांनी बैठकीत जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, म्हणून गोंधळ घातला. त्यावर जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी जाहीरपणे माफी मागत असल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकारावर पडदा पडला. दरम्यान, बैठकीला उपस्थित असलेल्यांची नावे उच्चारण्यावरूनही काहींनी नाराजी व्यक्त केली.
आम्हाला सांभाळून घ्या- रोहिणी खडसे
बैठकीत बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापुढच्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहू. आम्ही पक्षात नवीन आहोत, आमच्या हातून काही चुका घडू शकतात. त्यामुळे आम्हाला सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन ऍड. खडसेंनी केले. पक्षात आमचे सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले, याचा मनस्वी आनंद असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या
नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा
या बैठकीला माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, विद्यमान आमदार अनिल पाटील, चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख, माजी खासदार ऍड. वसंतराव मोरे आदींची अनुपस्थिती होती. त्यामुळे बैठकीत या नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली.