जळगाव - जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे जेवढे वय आहे, तेवढा शरद पवार यांचा राजकारणातला अनुभव आहे. त्यामुळे महाजन यांनी पवारांवर टीका करताना तारतम्य बाळगले पाहिजे. अशा शब्दात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी महाजनांचा खरपूस समाचार घेतला आहे.
हेही वाचा - विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह महातेकरांना दिलासा
दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी एका पत्रकार परिषदेत विरोधक वैफल्यग्रस्त आणि निराशेत असल्याची टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील महाजनांचा चिमटा काढला होता. रवींद्र पाटील यांनी महाजन यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शुक्रवारी दुपारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, शरद पवार यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री देखील राहिले आहेत. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन नेहमी आपले राज्य आणि देश प्रगतीपथावर कसा राहील? याचाच विचार केला. असे असताना महाजन यांनी त्यांच्याविषयी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. महाजन यांच्या वक्तव्याचा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आहोत, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा - राष्ट्रवादीला रामराम..! अखेर भास्कर जाधवांनी दिला आमदारकीचा राजीनामा
महाजनांनी पाच वर्षात काय केले?
गिरीश महाजन यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात कोणतेही भरीव कार्य केलेले नाही. जलसंपदा मंत्री असताना त्यांना साधे जिल्ह्यातील अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प पूर्ण करता आले नाहीत. नवीन प्रकल्प उभारणे तर दूरची गोष्ट आहे. जळगाव जिल्हा हा केळी आणि कापूस पिकांसाठी ओळखला जातो. मात्र, जिल्ह्यासाठी भाजप सरकारला काहीही ठोस कार्य करता आलेले नाही. गिरीश महाजन यांनी विरोधात असताना कापसाला ७ हजार रुपये हमीभाव मिळावा म्हणून आंदोलन छेडले होते. परंतु, त्यांच्याच सरकारच्या काळात कापसाला ५८०० रुपये भाव जाहीर झाला आहे, असे पाटील यांनी म्हणाले.
फक्त याला पक्षात घे, त्याला पक्षात घे असे चालत नाही -
गिरीश महाजन यांनी गेल्या पाच वर्षात काहीही केले असेल तर ते म्हणजे, फक्त याला पक्षात घे, त्याला पक्षात घे. असे करून चालत नाही. भाजपची राज्यभरात मेगा भरती सुरू असताना खानदेशातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही बडा नेता भाजपमध्ये गेला नाही. याचे शल्य महाजन यांना बोचत आहे. त्यामुळेच ते असे वक्तव्य करत असल्याचेही ते पाटील म्हणाले.