जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसला कमकुवत करण्यासाठीच महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेत विरोधक असलेल्या भाजपाकडून राजकारण करण्यात आले. या बँकेत जे काही घडले तो राजकारणाचाच भाग होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी केला. दरम्यान, आता हे प्रकरण निवळले असून, सीता जशी अग्निपरीक्षेतून पवित्र होऊन बाहेर पडली, तसे आम्ही लोक या प्रकरणातून बाहेर आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.
धक्कादायक आरोप
राज्य सहकारी बँकेतील 1600 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जळगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन अशा 76 जणांना सहकार विभागाच्या चौकशीत क्लीनचिट देण्यात आली आहे. चौकशी समितीकडून नुकताच सहकार आयुक्तांना अहवाल पाठवण्यात आला आहे. या विषयासंदर्भात जैन हे जळगावात आपल्या निवासस्थानी 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते. या साऱ्या प्रकरणाशी भाजपाचा संबंध जोडत ईश्वरलाल जैन यांनी धक्कादायक आरोप केले.
नेमके काय म्हणाले ईश्वरलाल जैन?
शिखर बँकेत जे काही घडले? ते राजकारणाचा एक भाग होता. राष्ट्रवादी काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी विरोधक असलेल्या भाजपाने केलेले ते षड्यंत्र होते. शिखर बँकेत बॉडी बरखास्त करण्याची आणि चौकशी करण्याची गरजच नव्हती. बँकेत झालेले व्यवहार पारदर्शी होते. या ठिकाणी सगळ्याच पक्षांचे लोक प्रतिनिधी म्हणून होते. त्यात शिवसेना, काँग्रेस, शेकाप तसेच राष्ट्रवादीचे लोक होते. हे सर्वजण एकत्र असताना ते व्यवहार पाहत होते. त्यामुळे या ठिकाणी गैरव्यवहार होईल तरी कसा? असा प्रश्नही माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी उपस्थित केला.
'आम्ही तावून-सुलाखून बाहेर पडलो'
ईश्वरलाल जैन पुढे म्हणाले, की आता हे प्रकरण निवळले आहे. शेवटी सीता जशी अग्नीपरीक्षेतून पवित्र होऊन बाहेर पडली, तसे आम्ही लोक तावून-सुलाखून बाहेर पडलो आहोत. मी पाव आणादेखील कधी बँकेचे मानधन घेतले नाही. बँकेची गाडी वापरली नाही. तरी 25 लाखांची रिकव्हरी माझ्याकडे काढली. ही रिकव्हरी माझ्याकडे कशासाठी काढली, मी काय गुन्हा केला होता. जे माझ्याबरोबर घडले; तेच सर्वांसोबत घडले. शेवटी चौकशीचे सर्व अहवाल स्पष्ट झाले. निर्णय आमच्या बाजुने लागला. उशिरा का होईना निकाल आमच्या बाजूने लागला, याचे समाधान आहे. न्याय मिळाल्याचा तसेच आमच्यावर जो खोटा आरोप होता त्यातून आम्ही मुक्त झालो, याचा आनंद असल्याचे जैन यांनी सांगितले.
'भाजपाने लोकांची दिशाभूल केली'
या प्रकरणात न्यायालयाने न्यायालयाचे काम केले. न्यायालयासमोर जी बाजू मांडली गेली, त्या आधारे न्यायालयाने आदेश दिले आहेत. जर आम्ही दोषी होतो तर पाच वर्ष भाजपाचे राज्य होते. त्यांनी आम्हाला धरायला पाहिजे होते. पण त्यांनाही माहिती होते, की या प्रकरणात काहीही तथ्य नाही. पण केवळ लोकांची दिशाभूल करायला आणि आम्हाला धाक दाखवण्यासाठी भाजपाने हे षड्यंत्र केले. म्हणून त्यांनी पाच वर्ष या प्रकरणात काहीही केले नाही, असा आरोप जैन यांनी यावेळी केला.
काय आहे प्रकरण?
राज्य सहकारी बँकेतील तत्कालीन संचालक मंडळाच्या वादग्रस्त निर्णयांमुळे बँकेचे सुमारे 1600 कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा ठपका ठेवण्यात आला होता. तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार निवृत्त प्रधान जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. सहकार कायद्याच्या कलम 88 अन्वये चौकशी करण्यात आली. याबाबतचा अहवाल न्यायाधीश जाधव यांनी सहकार विभागाला सादर केला आहे. त्यात या संचालकांवर ठपका ठेवता येणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.