जळगाव - 'कोरोना' व्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी शासन पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. 50 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, लोकांनीच सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जळगाव दौरा स्थगित करण्यात आला आहे. ते सोमवारी (9 मार्चला) विविध कार्यक्रमांसाठी जळगावात येणार होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जळगाव दौरा आयोजित करण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे शेतकरी मेळावा आणि माजी आमदार कै. मु. ग. पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. त्याचप्रमाणे जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथेही जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोना व्हायरसच्या भीतीने हे दोन्ही कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.
हेही वाचा - महिला दिन विशेष : वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या 'सुपर रायडर' निशिगंधाने मिळवला 'हा' बहुमान!
देशात 'कोरोना' व्हायरसचा धोका निर्माण झाल्याने ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनीही दौरा स्थगितीला दुजोरा दिला आहे. शेंदुर्णी येथील कार्यक्रमाचे आयोजक माजी जि. प. सदस्य संजय गरूड यांनी सांगितले, 'कोरोना' व्हायरसचा धोका लक्षात घेवून दौरा स्थगित करण्यात आला आहे. दिल्ली येथून शरद पवार यांचे स्वीय सहाय्यकांनी फोन करून दौरा स्थगित झाल्याचे आपणास सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत, अशी माहिती गरुड यांनी दिली आहे.