जळगाव - जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी प्रवेश करत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत केली. यानंतर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून खडसे यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. खडसे राष्ट्रवादीत येत असल्याने भविष्यात भाजपाला मोठे खिंडार पडणार असल्याची माहिती यावेळी रविंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे अनेक मुहूर्त हुकल्यानंतर आता शुक्रवारी (दि.२३) ते आपली कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे निश्चित झाले आहेत. खडसे राष्ट्रवादीत येत असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी आज मुंबईत केली. या घोषणेनंतर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर जिल्हा व महानगर पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जल्लोष केला. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जल्लोष केल्यानतंर जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. तसा फोन देखील त्यांनी आपणास केला. खडसे यांचे आम्ही राष्ट्रवादीत स्वागत करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. गेल्या २० वर्षापासून भाजपाला बळकट करण्याचे काम खडसे यांनी केले. जिल्हा बँक असेल किंवा दूध फेडरेशन, जिल्हा परिषद तसेच आमदारकी, खासदारकीची निवडणूक असेल यात खडसे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. आज खडसे यांचा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील प्रभाव आहे. राज्यात भाजप सत्तेवर असताना ते १२ खात्यांचे मंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या या प्रदिर्घ अनुभवाचा राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली खडसे राष्ट्रवादीत येतील. खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील भाजपाला फार मोठे खिंडार पडेल, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.
खडसेंच्या माध्यमातून भाजपाचा खरा चेहरा समोर आणणार
प्रवेशानंतर खऱ्या अर्थाने एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून भाजपाचा चेहरा लोकांसमोर आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. गेल्या २० वर्षांपासून सरपंच ते पंतप्रधान पदापर्यंत सत्ता भाजपला दिली. मात्र, आता लोकांची निराशा झाली आहे. शेतकरी, विद्यार्थी व जनतेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची जाण असलेला नेता राष्ट्रवादीत येत असल्याचेही ते म्हणाले. प्रवेशानंतर खडसे पक्षाचे संघटन वाढवतील, त्यांना मंत्रीपद कुठले द्यायचे काय निर्णय घ्यायचे हा श्रेष्ठींचा विषय असल्याने त्यावर मला सांगता येणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.