जळगाव - इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने सोमवारी दुपारी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी एका दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना देशभरात पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरची सातत्याने दरवाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच असल्याने महागाईचा आलेख वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या विषयासंदर्भात केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर नेली प्रतिकात्मक अंत्ययात्रा -
इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. राष्ट्रवादी पक्ष कार्यालयापासून ही अंत्ययात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इंधन दरवाढ तातडीने थांबवावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष स्वप्नील नेमाडे, रवींद्र पाटील, वाल्मिक पाटील, मंगला पाटील, योगेश देसले, अशोक लाडवंजारी, सुनील माळी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केंद्र सरकारला आश्वासनांचा विसर-
यावेळी आंदोलनाची भूमिका मांडताना जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील म्हणाले, केंद्र सरकार महागाई नियंत्रणात आणण्यात सपशेल अपयश आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने दरवाढ होत आहे. या दोन्ही इंधनाच्या किंमती शंभराच्या उंबरठ्यावर आहेत. विरोधात असताना महागाईच्या विषयावर गळा काढणाऱ्या भाजप सरकारचा आता गळा बसला आहे. केंद्र सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, अशी टीका अॅड. पाटील यांनी केली.
अन्यथा तीव्र आंदोलन-
केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढवत असून, महागाई वाढतच चालली आहे. केंद्राने इंधनाचे दर कमी करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा नेमाडे यांनी दिला.