जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत असून, बाधितांची संख्याही दिवसेंदिवस दिवस वाढतच आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही नागरिक बेजबाबदारपणे घराबाहेर पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीने कोरोनाबाबत अनोखी जनजागृती केली. कोरोनाबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी यमाच्या वेशभूषेत जनजागृती केली.
नशिराबाद ग्रामपंचायतीच्या कार्यालयापासून गावातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून जनजागृतीपर संचलन करण्यात आले. कोरोना हा जीवघेणा आजार आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नका, तोंडाला स्वच्छ रुमाल किंवा मास्क बांधा, एकमेकांपासून सामाजिक अंतर ठेवा, कोरोनाच्या नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. संचलन करतेवेळी लक्षवेधी स्वर्गरथ तयार करण्यात आला होता. या रथावरून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना कोरोनाबाबत सतर्कतेचे आवाहन केले जात होते.
ग्रामपंचायत कर्मचारी शाम बिऱ्हाडे यांनी यमाची वेशभूषा साकारली होती. त्यांनी नागरिकांना 'घराबाहेर पडू नका... बाहेर यम तुमची वाट पाहतोय', अशा शब्दांत घरातच थांबण्याचे आवाहन केले. या उपक्रमात ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि काही ग्रामस्थांनी सहकार्य केले.