जळगाव: भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतींबद्दल अवमानकारक (Governor Bhagat Singh Koshyari on shivaji maharaj) वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपाच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपाच्या प्रवक्त्याने अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
जळगाव जामोद येथे पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीचा (Sudhanshu Trivedi) खरपूर समाचार घेतला. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपाल कोश्यारींची जीभ कशी झडली नाही? त्यांच्या अशा विधानातून आरएसएसची मानसिकता दिसून येते. महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या दैवतांचा धडधडीत अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी? निवडणुकीत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसून वारंवार त्यांचाच अपमान करता, ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आहे. असं पटोले म्हणाले.
भारत जोडो यात्रा ऐतिहासिक- विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, भारत जोडो यात्रा हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण ठरला आहे. लोकशाहीतील स्तंभ डळमळीत होत असताना ते मजबूत रहावेत यासाठी ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे. याबरोबर जनतेच्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम झाले. महागाई, बेरोजगारी याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये नैराश्य असल्याचे दिसले, हे वातावरण बदलले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, प्रभारी, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.