जळगाव - आम्ही काही तरी काम करतोय, हे भासवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमी बैठका घेतात, पेपरबाजी करतात. पण, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय घेत नाहीत. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने, विशेष करून मुख्यमंत्र्यांनी केले तरी काय?, अशी खोचक टीका आज (दि. 2 नोव्हेंबर) भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही बाबतीत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता कमालीची नाराज आहे. जनतेच्या मनात सरकारविषयी प्रचंड असंतोष आहे, असेही महाजन यावेळी म्हणाले.
केळी पीक विमाप्रश्नी भाजपच्या वतीने माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली आज (सोमवारी) दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर महाजन पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी केळी पीक विमा, एकनाथ खडसे, राज्यातील सिंचन गैरव्यवहार अशा विषयांवर मत मांडले. या प्रसंगी महाजन यांच्या सोबत खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंदूलाल पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
महाविकास आघडीकडून नुसते राजकारण सुरू
गिरीश महाजन म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारकडून नुसते राजकारण सुरू आहे. आम्ही काही तरी काम करत आहोत, असे सरकार भासवत आहे. पण, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा निर्णय सरकारकडून घेतला जात नाही. गेल्या वर्षभराच्या काळात या सरकारने, विशेष करून मुख्यमंत्र्यांनी एकही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. मराठा आरक्षण, शिक्षणक्षेत्र किंवा शेतकर्यांच्या संदर्भात एकही निर्णय झाल्याचे दिसून येत नाही. राज्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर तसेच विद्यार्थी यांच्यामध्ये सरकारविषयी कमालीचे नाराजीचे वातावरण आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.
पुढाऱ्यांचे खिसे गरम करण्यासाठीच पीक विमा योजना
केळी पीक विम्याच्या मुद्द्यावर मत मांडताना गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात सुमारे 50 हजार केळी उत्पादक शेतकरी आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी केळी पीक विमा काढलेला आहे. पण, राज्य सरकारने पीक विम्याचे निकष बदलल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. केळी पीक विम्याचे निकष बदलणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करणे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही या विषयासंदर्भात सरकारशी भांडत आहोत. नव्याने लागू केलेले निकष अतिशय जाचक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयाचा देखील लाभ मिळणार नाही. पीक विम्यापोटी कोट्यवधी रुपये भरून एक रुपयाचा देखील लाभ मिळणार नसल्याने जुने निकष कायम असावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पीक विमा योजनेत मोठा भ्रष्टाचार आहे. विमा कंपनी तसेच पुढाऱ्यांचे खिसे गरम करण्यासाठीच ही योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे तर मंत्र्यांना पर्यायाने सरकारला होणार आहे. त्यामुळे ही योजना सरकार कशासाठी राबवत आहे, हा आमचा प्रश्न आहे. या योजनेच्या विषयावरून केंद्र सरकारची नाहक बदनामी होत आहे. येत्या चार ते पाच दिवसात पीक विम्याप्रश्नी योग्य तोडगा निघाला नाही, तर येत्या नऊ तारखेला जळगाव जिल्ह्यात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गिरीश महाजन यांनी यावेळी दिला.
तीनही पक्ष एकमेकांशी भांडण्यात व्यस्त
महाविकास विकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रचंड उदासीन आहे. कापूस, मका या पिकांच्या शासकीय खरेदीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांच्या दुःखाकडे सरकार बघायला तयार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मरायचे का? हे तीन पक्षाचे सरकार एकमेकांमध्ये भांडण्यातच व्यस्त आहे, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी यावेळी केली.
खडसेंनी आमच्या कार्यकर्त्यांची काळजी करू नये
भाजपवर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याने ते आपले राजीनामे देत आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी भाजपवर केली होती. याबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी खडसेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 'खडसे आता आमच्या पक्षातून गेले आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा देखील प्रदान केल्या आहेत. आमच्या कार्यकर्त्यांची काळजी खडसेंनी करू नये. आमचे कार्यकर्ते आहेत; त्याच ठिकाणी आहेत. कार्यकर्त्यांची बांधिलकी पक्षाची आहे. पक्षाच्या विचारांची आहे. कुठल्या व्यक्तीशी नाही. त्यामुळे पक्षाला भगदाड पडेल किंवा पोकळी निर्माण होईल, असे नाही. पक्ष आहे, त्याच ठिकाणी आहे. उलट यापुढच्या काळात जळगाव जिल्ह्यात पक्ष जोमाने वाढेल', अशी आपल्याला खात्री असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
सिंचन गैरव्यवहारात तथ्य
सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) आता राज्यातील सिंचन गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे, याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, सिंचन गैरव्यवहारात निश्चितच तथ्य आहे. त्याचे पुरावे देखील आमच्या सरकारच्या काळात आम्ही सादर केले होते. पण, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सिंचन गैरव्यवहारात क्लिनचीट दिली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची इडीकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यातील सत्यता समोर येईल, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
हेही वाचा - आम्हालाही आर्थिक संकटातून बाहेर काढा; टेंट आणि डेकोरेशन व्यावसायिकांचा एल्गार