जळगाव - देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. राज्य सरकारवर टीका करणे, सरकारला सूचना करणे हे त्यांचे कामच आहे. फडणवीस हे चांगले सूचनाकार असून, त्यांनी कायम आमच्या सरकारला सूचनाच कराव्यात, अशा बोचऱ्या शब्दांत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे.
येथील जिल्हा परिषदेत जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर गुलाबराव पाटील हे माध्यमांशी बोलत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. वाढीव वीजबिलासह अनेक मुद्द्यांवरून फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार सावकारी वृत्तीचे असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. यावर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात प्रत्युत्तर दिले आहे.
गुलाबराव पाटलांची फडणवीस यांच्यावर बोचरी टीका त्यांचे कामच आहे टीका करणे-यावेळी गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेते म्हणून सरकारवर टीका करणे हे देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे. मात्र, आमचे काम आहे काम करत राहणे. जोपर्यंत ते बोलत नाही, तोपर्यंत आम्हाला सूचना कळत नाहीत, ते चांगले सूचनाकार असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली.
दिव्यांगांसाठी शौचालय बांधकामाचा शुभारंभ-मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत दिव्यांगांसाठी शौचालय बांधकामाचे शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, सीईओ डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त सीईओ गणेश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि. प. सदस्य अमित देशमुख, नानाभाऊ महाजन आदी उपस्थित होते.
वीज बिलांसंदर्भात आज कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय?टाळेबंदीच्या काळात महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली होती. ही बिले माफ करण्यात यावी, अशी मागणी केली जात असताना राज्य सरकारने रिडींगनुसार आलेली बिले भरावीच लागतील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. वाढीव वीज बिलांच्या संदर्भात होणाऱ्या टीकेबाबत गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत या विषयाबाबत निर्णय होईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले.