जळगावा - खान्देशची 'मुलुख मैदान तोफ' म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दुपारी २ वाजता पाळधी गावात जिल्हा परिषद मराठी शाळेत मतदान केले. सजवलेल्या बैलगाडीतून मतदान केंद्रावर येत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात सेनेचे गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तथा धरणगाव नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पा महाजन यांच्यात प्रमुख लढत आहे. सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख लढाईत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्यामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे.
गुलाबराव पाटील हे दुपारी दीड वाजता आपल्या कार्यालयापासून सजविलेल्या बैलगाडीतून मतदान केंद्रावर जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा होता. गुलाबराव पाटील हे आपल्या अनोख्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी देखील गुलाबराव पाटील रिक्षातून मतदानासाठी मतदान केंद्रावर आले होते. यावेळी ते चक्क सजवलेल्या बैलगाडीतून आले. दरम्यान, यावेळी आपण 50 हजारांपेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून येऊ, असा विश्वास देखील यावेळी गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला.