जळगाव - दारूबंदीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. यासाठी अनेक ठिकाणी महिला तसेच विविध संघटना रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. अशातच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात दारू व्यवसायाचे समर्थन केले आहे. हॉटेलचा व्यवसाय बिअरबार, परमिट रुमची जोड दिल्याशिवाय चालत नाही, असा स्वतःचा अनुभव असल्याचे वक्तव्य पाटलांनी केलंय.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने केसीई सोसायटीच्या मैदानावर 'पंतप्रधान मुद्रा योजना' जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना, मेळव्याला उपस्थित असणारे बेरोजगार तरुण तसेच विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी दारूचे समर्थन केले आहे. यावेळी त्यांनी स्वत: केलेल्या व्यवसायाचे उदाहरण दिले.
शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सुरुवातीला भाड्याने शाकाहारी हॉटेल सुरू केल्याचे पाटलांनी सांगितले. मात्र, ते हॉटेल चालत नव्हते. म्हणून ते हॉटेल मांसाहारी करण्यात आले. तरीही मटण उरलं, की ते दुसऱ्या दिवशी संपत नव्हते. अखेर ते हॉटेल बिअरबार, परमिट रूम केले. यानंतर हॉटेल जोरात चालायला लागल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
मांसाहारी हॉटेल असताना एका दिवसात 4 हजार रुपये जमा होत होते. मात्र, ते हॉटेल परमिटरूम झाल्यावर एका दिवसात 20 हजार रुपयांवर धंदा गेल्याचे त्यांनी सांगितले. जाहीर कार्यक्रमात एका मंत्र्याने दारू व्यवसायाचे समर्थन केल्याने चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर हरकत घेतल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
या मेळाव्याला आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्र, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगीकृत व्यवसाय असलेल्या विविध विकास महामंडळांचे स्टॉल लावण्यात आले होते. याठिकाणी युवकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.