जळगाव - राज्यभरात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे आज निकाल समोर आले आहेत. या निकालांवर एक नजर टाकली तर ग्रामीण भागातील मतदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कोरोना, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक संकटांमध्येही महाविकास आघाडी सरकारने चांगली कामे केल्याने ग्रामीण भागातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर गुलाबराव पाटील जळगावात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीचे निकाल म्हणजे, एकप्रकारे जनतेने महाविकास आघाडी सरकारच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. सरकारने जनतेच्या गावपातळीवरील कामांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जनतेला हे सरकार आपले वाटते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांना याठिकाणी यश मिळाले आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात भाजपचे अस्तित्त्व नावापुरते-
यावेळी गुलाबराव पाटील यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून यापुढे ग्रामीण भागात आमची सत्ता अबाधित राहील, हे स्पष्ट झाले आहे. जळगाव जिल्ह्यात तर भाजप नावापुरता, काही गावांपुरता उरला आहे. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचे झाले तर, राज्यभर शिवसेनेने मजबुती आघाडी घेतली आहे, असा दावाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.
ग्रामीण मतदारांनी विचारपूर्वक कौल दिलाय-
ग्रामीण भागातील मतदार हा जागरूक असतो. यावेळी लोकांनी विचारपूर्वक मतदान केले आहे. राज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रुपाने एल शांत, संयमी आणि हुशार नेतृत्त्व लाभले आहे. अशा नेतृत्त्वाच्या विचारांच्या पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायतीची सत्ता दिली तर निश्चितच विकासाला चालना मिळेल, हा विश्वास मतदारांनी दाखवला आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
पाळधीकरांचा कौल दोघांनी मान्य करावा-
पाळधी खुर्द गावात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. त्यात गेल्या 25 वर्षांपासून सत्ता सांभाळणारे शरद कासट यांच्या विकास पॅनलला मोठा धक्का बसला. त्यांना फक्त 3 जागा मिळाल्या. याठिकाणी परिवर्तन पॅनलचे 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवला. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, पाळधीत शिवसेनेचेच दोन्ही पॅनल रिंगणात होते. आम्ही बिनविरोधसाठी प्रयत्न केले. पण त्यात यश आले नव्हते. आता पराभूत झालेले पण आमचेच कार्यकर्ते आहेत, तसेच निवडून आलेले पण आमचेच कार्यकर्ते आहेत. दोघांचे मी अभिनंदन करतो. जनमताचा कौल त्यांनी मान्य करावा, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यातील 13 हजार 847 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला; सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी