जळगाव - राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी ज्या 12 लोकांची नियुक्ती रखडली आहे, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. ही काही आजची गोष्ट नाही. शेवटी राज्यपालांनी याबाबतचा निर्णय लवकर घेतला पाहिजे होता. नियुक्तीचा अधिकार त्यांना आहे. पण त्यांच्या डोक्यात काय आहे, तेच आम्हाला माहिती नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांवर टीकास्त्र डागले आहे.
मंत्री गुलाबराव पाटील हे शनिवारी दुपारी जळगावात होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात राज्याला केलेली मदत अशा विषयांवर मते मांडली.
न्यायालयाला काय उत्तर देतात, याची मलाही उत्सुकता-मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबत न्यायालयाने राज्यपालांच्या मुख्य सचिवांना विचारणा केली असून, त्याचे उत्तर दोन आठवड्यात मागितले आहे. आता ते न्यायालयाला काय उत्तर देतात, याची तुमच्याप्रमाणे मलाही उत्सुकता आहे. राज्यपाल नियुक्त आमदार करणे ही काही आजची गोष्ट नाही. ही बाब परंपरागत सुरू आहे. आमदार मग तो विधानसभेचा असो किंवा विधानपरिषदेचा, प्रत्येकाच्या डोक्यात विकासाच्या बाबतीतच नव्हे तर राज्याला सूचना देण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची कल्पना असते. त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीला महत्त्व दिले पाहिजे. आपला देश विविध भाषा आणि प्रदेशात विभागला आहे. म्हणून कोणत्याही विधानसभा क्षेत्रात लोकप्रतिनिधींच्या जागा रिक्त राहणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
देशाचा नागरिक म्हणून सर्व आपद्ग्रस्तांना मदत व्हायला हवी-तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात देखील मोठे नुकसान झाले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त गुजरातला मदत केली. यावरून राज्यात सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ज्याप्रमाणे गुजरातला मदत केली तशी महाराष्ट्रालाही मदत केली पाहिजे होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात पाहणी दौरा केला. त्यामुळे त्यांनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला पण मदतीसाठी प्रयत्न करावेत, असा टोला फडणवीसांना लगावला. संकट काळात राज्य आणि केंद्र सरकारने मदत करायची असते. केंद्राने मदत करताना राजकारण न करता देशाचा नागरिक म्हणून मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
फडणवीसांचा घेतला खरपूस समाचार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून होत टीकेला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, कोरोना काळ किंवा नैसर्गिक आपत्तीवेळी विरोधकांनी कोणत्याही प्रकारची टीका-टिप्पणी करायला नको. अशा कठीण काळात राजकारण बाजूला ठेऊन सूचना केल्या पाहिजेत, मार्गदर्शन झाले पाहिजे. अनुभवाचे बोल सांगायला हवे. मुख्यमंत्री ठाकरेंनी कोकणात जाऊन मदतीची केलेली घोषणा तपासली तर मुख्यमंत्र्यांनी काय केले हे फडणवीसांच्या लक्षात येईल. मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण व्हीसीवरून काम करत आहेत. ते पण पहिल्यांदा गुजरातला गेले. मुख्यमंत्री जरी घरात असले तरी यंत्रणा बंद आहे का? आम्ही रस्त्यावर नाहीत का? मंत्री रस्त्यावर काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच काम चालत आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.