जळगाव - माझ्याविरोधात कोणीतरी पक्षश्रेष्ठींच्या मनात विष कालवतोय, असे नुसते म्हणण्यापेक्षा एकनाथ खडसेंनी त्याला समोर आणलेच पाहिजे. पक्ष इतक्या कच्च्या कानाचा नाही की कोणीतरी फुंकले आणि एखाद्याचे तिकीट कापले असे होत नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली.
हेही वाचा - सोलापुरात घोड्यावरून येऊन भरला उमेदवारी अर्ज; पोलीस दाखल करणार गुन्हा
पहिल्या यादीत नाव डावलल्यानंतर मुक्ताईनगर येथे झालेल्या जाहीर सभेत एकनाथ खडसेंनी आपल्या मनातील दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. 'माझ्याविरोधात कोणीतरी पक्षश्रेष्ठींच्या मनात विष कालवतोय म्हणून माझ्या बाबतीत असे सातत्याने घडत आहे', असे वक्तव्य खडसेंनी केले होते. आज जळगावात असताना गिरीश महाजनांनी माध्यमांशी बोलताना खडसेंचे वक्तव्य खोडून काढले.
हेही वाचा - 'भाजप गुंडांना तिकीट देते, त्यामुळे दाऊदच्या टोळीतील लोकदेखील खासदार झालेत..'
पक्ष इतक्या तडकाफडकी कोणताही निर्णय घेत नसतो. पण, एकनाथ खडसेंना जर खरचं काही माहिती असेल तर त्यांनी ती माहिती निश्चित उघड केली पाहिजे. फक्त कोणीतरी षडयंत्र रचत आहे, असे म्हणण्यापेक्षा जो कोणी असेल त्याला समोर आणलेच पाहिजे, असे आव्हानच महाजन यांनी खडसेंना यावेळी दिले. खडसेंच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी विचार करत आहेत. निश्चित खडसेंच्या बाबतीत योग्य निर्णय होईल, असेही महाजन यांनी सांगितले.
खडसेंच्याबाबतीत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेणार-
एकनाथ खडसेंची उमेदवारी कापली गेली आहे का? अशी विचारणा पत्रकारांनी केली असता महाजन म्हणाले, की तशी चर्चा आहे. पण, मला त्याबाबतीत काहीही माहिती नाही. खडसेंच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिल्लीचे नेते निर्णय घेतील. परंतु, पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. अजून अंतिम यादी आलेली नाही. फक्त खडसेच नाही तर विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे अशा महत्त्वाच्या नेत्यांबाबतही निर्णय व्हायचाय. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच यांचे तिकीट कापले, त्याचे तिकीट कापले, असे म्हणता येईल, असेही महाजन म्हणाले.
हेही वाचा - गांधी@१५० : ईटीव्ही भारतचे विशेष गीत; पंतप्रधानांसह इतर मान्यवरांकडून कौतुक
जागा वाटपात माझी भूमिका नाही-
कुठल्याही जागा वाटपात माझी भूमिका नाही. मी फक्त जागा वाटपाच्या समितीत आहे. जागा वाटपाचा निर्णय केंद्रातील संसदीय समिती, राज्यातील समिती मिळून घेत असते, असे सांगून महाजन यांनी भाजप आणि सेनेतील जागा वाटपाबाबत बोलणे टाळले.