जळगाव - भाजप खासदार नारायण राणेंचे काय? ते महान नेते आहेत. महाराष्ट्रातच काय ते देशातही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतील. राज्यावर कोरोनाचे संकट असताना विरोधी पक्षाकडून होणारे राजकारण योग्य नाही, अशी टीका राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज जळगावात केली.
जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यातील खरीप तयारीचा आढावा घेण्यासाठी दादा भुसे जळगावला आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भुसे यांनी राणेंच्या मागणीवर आपली प्रतिक्रिया दिली. भाजपचे नेते नारायण राणे यांनी राज्यपालांना भेटून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा व मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे, अशी कारणे त्यांनी राज्यपालांना दिली होती. यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे.
दादा भुसे पुढे म्हणाले, 'राज्य सरकार कोरोनोचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याबाबत जनजागृती करीत आहे. यामुळेच कोरोना बाधितांचा आकडा आटोक्यात आहे. मात्र, विरोधी पक्ष कोरोनाच्या परिस्थितीतही राजकारण करीत आहे, हे चांगले नाही.'
राजभवनावर कोणालाही जाण्याचा, त्याठिकाणी मत मांडण्याचा अधिकार आहे, मात्र, त्यातून काहीतरी राजकीय उलथापालथ होईलच असे नाही. कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असेही यावेळी दादा भुसे म्हणाले.
हेही वाचा - जळगावातून १ जूनपासून विमानसेवा सुरू, दोन दिवसात २० टक्के बुकिंग
हेही वाचा - हजारावर लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झालेल्या जळगावातील मृत प्रौढाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह..!