जळगाव - 'वीर जवान अमित पाटील अमर रहे' अशा जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या 183 बटालियनमध्ये कार्यरत असलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी त्यांच्या मूळगावी वाकडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी (16 डिसेंबर रोजी) जम्मू-काश्मिरातील पूंछ भागात अमित पाटील यांना वीरगती प्राप्त झाली होती.
हुतात्मा जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सकाळी अमित यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. कुटूंबीय व नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून शोकाकूल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा धरून तरूण पुढे चालत होते. फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रेस सुरुवात झाली. वाकडी गाव व परिसरातून अंत्ययात्रा मोकळ्या मैदानात आली. तेथे सुरुवातीस वीर जवान अमित पाटील यांच्या पार्थिवास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांना पोलीस दल व सीमा सुरक्षा दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांचे लहान बंधू यांनी अग्नीडाग दिला. वीर जवान अमित यांच्यामागे वडील साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशाली, एक मुलगा, एक मुलगी, एक बहिण, एक भाऊ असा परिवार आहे.
हुतात्मा जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार लोकप्रतिनिधींची होती उपस्थिती-यावेळी माजीमंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी वाय. एन. वाळेकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी वाकडे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुतात्मा जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सजवलेल्या वाहनातून निघाली अखेरची मिरवणूक-अमित यांच्या राहत्या घरापासून अखेरची मिरवणूक निघाली. सजवलेल्या वाहनातून ही मिरवणूक निघाली. मिरवणुकीत लष्कराचे अधिकारी, जवान, स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. अमित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उसळणार असल्याची शक्यता गृहीत धरून अंत्यसंस्कारासाठी गावाच्या शेजारील शेतात मोकळ्या जागी व्यवस्था करण्यात आली होती.
मिरवणूक मार्गावर सडा, रांगोळ्या-गावातील महिला व युवतींनी अंत्यसंस्काराच्या मिरवणूक मार्गावर सकाळीच सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. गावात ठिकठिकाणी अमित यांना आदरांजली अर्पण करणारे बॅनर लागले होते. गावाच्या सुपुत्राला अखेरचा देण्यासाठी समस्त वाकडीवासी आपल्या परीने शक्य ते प्रयत्न करताना दिसून आले. अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर गावातील प्रत्येक घराच्या गच्चीवरून महिला, युवती, लहान मुले मिरवणुकीवर पुष्पवर्षाव करत होते.
हुतात्मा जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर-शेतकरी कुटुंबात जन्मलेले अमित हे लहानपणापासून मनमिळाऊ स्वभावाचे होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सतत चांगल्या कामासाठी पुढाकार घेत असत. त्यामुळे गावातील प्रत्येक जण त्यांच्याशी परिचित होता. वडिलांनंतर घरातील कर्ता म्हणून त्यांच्या खांद्यावर जबाबदारी होती. त्यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले आहे. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. यावेळी उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
हुतात्मा जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पंचक्रोशीत देशभक्तीपर वातावरण-
अमित पाटील यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार असल्याने वाकडीच्या पंचक्रोशीत देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीते वाजवली जात होती. अंत्ययात्रेत सहभागी झालेले तरुण 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे', अशा घोषणा देत होते.