जळगाव - गेल्या आठ महीन्यांपासून कोरोना संकटामुळे जळगावातील बाजारपेठेला मरगळ आली होती. मात्र, आता अटोक्यात येणारा कोरोना संसर्ग, दुसरीकडे शासनाने सुरु केलेला अनलॉक यामुळे मरगळ झटकून जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठ दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
लॉकडाउनमुळे मार्च ते जून पर्यंत जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा बंद होत्या. मात्र, अनलॉकला सुरुवात झाल्याने काही महिन्यांपासून सम- विषमनुसार बाजारपेठ सुरु करण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजारपेठेत मंदीचे सावट होते. यंदा परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी फटका दिल्याने शेतीमालाचे नुकसान होवून शेतकरी संकटात सापडला. अशा या दुहेरी संकटामुळे बाजारपेठेतील उलाढाल थांबल्याची परिस्थिती झाली होती. मात्र, विजयादशमी अर्थात दसऱ्यापासून नागरिकांच्या खरेदीच्या उत्साहामुळे जळगावच्या बाजारपेठेत देखील चैतन्य पसरले आहे. नवरात्री, दसऱ्यानतंर आता प्रकाशाचा उत्सव असलेली दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्याने व्यापार व उद्योगाची चाके गतीमान झाली आहेत.
हेही वाचा -पदवीधर निवडणूक : नागपुरात काँग्रेस, भाजपच्या उमेदवारांनी भरला अर्ज
दिवाळीच्या मुहूर्तावर वाहनांची बुकींग
करोनाच्या लॉकडाऊननंतर खुल्या झालेल्या वाहन बाजारात देखील आता उलाढाल वाढली आहे. लॉकडाऊननंतर अनेकांनी वाहन खरेदी केली. काही जण मुहूर्ताच्या खरेदीसाठी थांबले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन बाजारात पुन्हा तेजी आल्याचे सुखद चित्र होते. यात दुचाकींची अधिक विक्री झाली. चारचाकी गाड्यांनाही मागणी होती. कोरोना असतानादेखील गत वर्षीपेक्षा यंदा दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्याभरात दिवाळीच्या मुहुर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांची चांगली बुकींग झाली आहे. येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होणार आहे. लाकडाऊनतंर घटस्थापना व दसऱ्याच्या मुहुर्तावर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सुमारे दहा ते पंधरा कोटींची उलाढाल झाली आहे. टीव्ही, होम थिएटर, फ्रीज, वॉशिंग मशिन, आरओ सिस्टिम यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. याशिवाय मोबाईल खरेदीवर असलेल्या अनेक ऑफर्स कॅश करण्याच्या निमित्ताने मोबाईल खरेदीही अधिक झाली. यामुळे इलेक्ट्रॉनिक दुकानांवरदेखील दिवसभर गर्दी पाहण्यास मिळाली. दिवाळीसाठी इलेक्ट्रानिक्स मार्केट सज्ज झाले आहे. बुकींगसाठी जळगावकरांची गर्दी होत आहे. नवरात्री- दसऱ्यापेक्षा जास्त उलाढाल दिवाळीत होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा -पक्ष माझ्या बापाचा... मला माज नाही तर प्रेम आहे, पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
प्रापर्टी सेक्टरमध्येही उत्साह
जळगाव जिल्ह्यातील प्रापर्टी सेक्टरवर देखील करोना संकटाने विपरीत परिणाम केला होता. मात्र, नुकताच साजरा झालेल्या दसरा व अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रापर्टी सेक्टरमध्ये देखील काहीसा उत्साह आला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तीनशे ते चारशे जणांनी जळगाव शहरात गृहप्रवेश केला. आगामी दिवाळीच्या मुहुर्तावर देखील अनेक बुकींग होण्याची अपेक्षा आहे.
किरकोळ बाजारपेठेलाही बहर
दिवाळीच्या सणाच्या अनुषंगाने जळगाव शहरातील रिंगण मार्ग परिसर, शिवतीर्थ मैदान, टॉवर चौक याठिकाणी पणत्या, दिवे, मातीचे आकाशकंदील विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. या दुकानांवर ग्राहकांची वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव... त्यामुळे दिवाळीसाठी दिवे, पणत्या विविध आकारातील व रंगसंगतीतील मातीचे आकाशकंदील खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. घराची शोभा वाढवण्यासाठी तोरण, मातीच्या झुंबरची खरेदी देखील मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.