चाळीसगाव (जळगाव) - तालुक्यात आतापर्यंत 538.87 मिमी पाऊस झाला आहे. सर्व मंडळात समाधानकारक झालेल्या पावसामुळे पिकांची स्थिती उत्तम आहे. विशेष म्हणजे तालुक्यासाठी वरदान ठरणारे मन्याडसह अन्य सहा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तालुक्याची सरासरी 751.47 मिमी पाऊस पडतो. यंदा जूनमध्ये 217.78 मिमी पाऊस झाला. यानंतर जुलैच्या सुरुवातीला पावसाने काहीसा खंड दिला. पहिल्या पंधरवड्यात केवळ 84 मिमी पाऊस झाला. त्यानंतर मात्र अनेक भागात पाऊस झाल्याने 9 ऑगस्टपर्यंत तालुक्यात एकूण 538.87 मिमी पावसाची नोंद झाली. परिणामी 14 पैकी सहा लघु प्रकल्पांमध्ये जुलै महिन्यातच शंभर टक्के जलसाठा झाला. 22 गावांसाठी वरदान असलेल्या मन्याडसह खडकीसीम, वाघला-1, पिंपरखेड, वलठाण, बाणगाव, कृष्णापुरी, मुंदखेडा, कोदगाव ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत
चाळीसगाव तालुक्यासाठी 6 हजार टन युरियाचा पुरवठा
दरम्यान, वेळेवर पाऊस आणि गरजेच्या वेळी पाऊस असल्याने तालुक्याची पीक स्थिती उत्तम आहे. सध्या कपाशी फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. मात्र, उंबरखेड, मेहुणबारे, वरखेडे, तिरपोळे, जामदा, दस्केबर्डी, बहाळ, टेकवाडे, पाटणा, सायगाव, अलवाडी, देशमुखवाडी, पिलखोड, बहाळ या भागात ऊसावर मावा व मक्याच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच सुरुवातीला निर्माण झालेेली युरियाची टंचाई आता निकाली निघाली. तालुक्यासाठी आतापर्यंत 6 हजार टन युरियाचा पुरवठा झाल्याचे चाळीसगावचे कृषी अधिकारी एम.एस. भालेराव यांनी सांगितले.