जळगाव - महिनाभरापासून कोरोना संसर्गाचा आलेख उतरता असून, त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने घसरत आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या आत असून, त्यांपैकी बाराशेवर रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. केवळ साडेसहाशे रुग्णच दाखल आहेत. त्यामुळे कोव्हिड सेंटरमधील बेड रिकामे पडले आहेत. असे असले तरी नागरिकांनी अद्यापही काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता. जूनपासून ही स्थिती बिकट होत गेली, ती सप्टेंबरच्या मध्यापर्यंत. दररोज आठशे-हजाराच्या घरात रुग्ण आढळून येत होते. जुलै, ऑगस्टमध्ये हे प्रमाण कमालीचे वाढले. तसेच मृत्यूदरही वाढत होता. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५० हजारांच्या पार गेली. सप्टेंबरमध्ये ॲक्टिव्ह रुग्णही दहा हजारांच्या वर गेल्यानंतर बेड मिळणे, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले होते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यात पंधरावर खासगी हॉस्पिटलला कोव्हिड उपचारासाठी परवानगी दिली होती.
महिन्यापासून दिलासा
सप्टेंबरच्या १७ तारखेपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली. महिनाभरात दररोज आढळून येणारे रुग्ण कमी आणि बरे होणारे अधिक असे चित्र दररोज दिसू लागले आहे. त्यामुळे स्वाभाविकच ॲक्टिव रुग्णांची संख्या कमी झाली. सप्टेंबरमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक असलेले ॲक्टिव्ह रुग्ण आता एक हजार ८६२ एवढे मर्यादित आहेत. त्यांपैकी केवळ ६६२ रुग्ण उपचारार्थ दाखल असून, उर्वरित एक हजार २२० गृहविलगीकरणात आहेत. त्यामुळे कोव्हिड सेंटरमधील बहुतांश बेड रिकामे झाले आहेत.
खासगी कोव्हिड सेंटर बंद-
जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पंधरापेक्षा अधिक कोविड सेंटर सुरू झाली होती. तीदेखील आता रुग्ण नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने बंद होऊ लागली आहेत. सध्या ही संख्या दहाच्या आत असून, जळगाव शहरात तर तीन-चारच खासगी कोविड सेंटर शिल्लक आहेत.
अशी आहे रुग्णांची स्थिती
एकूण रुग्ण : ५१,८८९
बरे झालेले : ४८,७६६
ॲक्टिव्ह रुग्ण : १,८६२
गृहविलगीकरणातील रुग्ण : १,२२०
सीसीमध्ये दाखल : १४६
डीसीएचसीमध्ये दाखल : २९९
डीसीएचमध्ये दाखल : २१७