जळगाव - जिल्ह्यातील रावेर, यावल तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे रावेर आणि यावल तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजप आणि सहकार क्षेत्रातील विविध कार्यकर्त्यांनी आज माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
गेले चाळीस वर्षे मी भाजप वाढीसाठी जीवापाड मेहनत घेतली. मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. आपल्या भागात केळी हे प्रमुख पीक आहे. कृषिमंत्री असताना केळी पीक विम्याच्या निकषांमध्ये बदल करून केळी उत्पादकांना विम्याचा लाभ मिळवून दिला. केळी पिकावर संशोधन व्हावे आणि शेतकऱ्यांना कमी किमतीत केळीची टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध व्हावे, यासाठी हिंगोणे येथे केळी संशोधन केंद्र मंजूर केले होते, त्याचबरोबर फळ संशोधन केंद्र, शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते. आता सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे प्रकल्प पूर्णत्वास न्यायचे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करायचे आहे. त्यासाठी नवे जुने सर्वांनी एकजुटीने मेहनत घ्यायची आहे, असे खडसे म्हणाले.
यावेळी बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, दुर्गादास पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सुनिल कोंडे, माजी सभापती राजू माळी, तालुका उपाध्यक्ष संदीप खाचणे, वाय डी पाटील, दूध संघ संचालक सुभाष टोके, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अरुण पाटील, बाळू शिंपी, कमलाकर पाटील, सुभाष खाटीक, सुनिलभाऊ काटे, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.