जळगाव - काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या मृत्यू ज्या सायटोमेगालो व्हायरसने झाला होता, त्या व्हायरसचा जळगाव जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे. नितीन नंदलाल परदेशी (वय ३३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी होता. नितीनला कोरोनानंतर सायटोमेगालो या व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
कोरोनातून झाला होता बरा-
नितीन परदेशी याला कोरोनाची लागण झाली होती. त्याने कोरोनाचे उपचार अमळनेरमध्येच घेतले. त्यानंतर तो बरा होऊन घरी गेला होता. मात्र, काही दिवसांनी त्याला पुन्हा ताप आला. ऑक्सिजनची पातळीही खालावली. म्हणून त्याला जळगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तरीही प्रकृती खालावत असलल्याने तसेच व्हेंटिलेटरची गरज भासत असल्याने डॉ. नीलेश किनगे यांच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर २५ दिवस उपचार करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
सायटोमेगालो व्हायसरची झाली होती लागण-
गेल्या काही दिवसांपासून नितीन परदेशी याची ऑक्सिजन पातळी सातत्याने घसरत होती. त्याला सायटोमेगालो व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने या आजाराशी संबंधित औषधे देण्यात येऊ लागली. प्रकृती बिघडतच गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
जुनाच आहे सायटोमेगालो विषाणू-
सायटोमेगालो विषाणू संदर्भात माहिती देताना 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले की, सायटोमेगालो हा विषाणू नवा नाही. तो अनेकदा सदृढ व्यक्तींच्या शरिरात निष्क्रीय अवस्थेत असू शकतो. रुग्णाची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की तो ॲक्टिव्ह होतो. यात रुग्णाला अंगावर पुरळ येणे, ताप येणे, ऑक्सिजन पातळी कमी होणे, यासारखी लक्षणे दिसून येतात. तसेच शरिराच्या कोणत्याही भागात त्याचे इन्फेक्शन होऊ शकते, असे डॉ. चव्हाण म्हणाले.