जळगाव : जिल्हा कारागृह कर्मचारी निवास स्थानावर चढून कारागृहात बंदी असलेल्या कैद्यासाठी विडी बंडलसह कपडे, साबण असलेली पिशवी आत फेकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणास पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. कारागृह रक्षकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन तीन कैद्यांनी पलायन केल्याच्या प्रकरणास तीन दिवस होत नाही तोपर्यंत हा आणखी एक गंभीर प्रकार मंगळवारी दुपारी १ वाजेच्या वाजता घडला. सोनुसिंग रमेश राठोड (वय २०, रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
सोनुसिंग राठोड हा मंगळवारी दुपारी प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या छतावर चढला होता. त्याच्या हातातील एका पिशवीत विडी बंडल, कपडे, साबण, टोस्टचे पाकीट असे साहित्य होते. कारागृहातील कैद्याला भिंतीवरुन तो साहित्य फेकून देणार होता. यासाठी तो कैद्याला आवाज देत होता. तत्पूर्वी राठोड याचा आवाज ऐकून कारागृह रक्षक अमितकुमार पाडवी हे बाहेर आले. पाडवी यांना पाहून राठोडने छतावरुन उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यात राठोडच्या हात-पायांना खरचटले. दरम्यान पाडवी यांनी सहकारी कुलदीपक दराडे, विक्रम हिवरकर व कारागृह अधिकारी किरण पवार यांना आवाज देऊन घटना सांगितली. या सर्व कर्मचाऱ्यांनी राठोड याचा पाठलाग करुन त्याला कारागृहाच्या समोर असलेल्या चहाच्या टपरी जवळून ताब्यात घेतले.
पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राठोडविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे कारागृहात होणारे गैरप्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. तर, तीन दिवसांपूर्वी कारागृहातून तीन कैदी पळून गेल्याने सध्या येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नदेखील चर्चेत आहे.