जळगाव - केंद्र सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी थांबविण्यात आली होती. मात्र, असंख्य शेतकऱ्यांचा मका अद्याप शिल्लक असल्याने खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुरावानंतर केंद्र सरकार मका खरेदी पुन्हा सुरू करणार आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात मका शिल्लक -
केंद्र सरकारचे अडीच लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने राज्यातील सर्व शासकीय मका खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश १८ डिसेंबरला काढण्यात आले होते. मात्र, मक्याची जवळपास महिनाभराने उशिरा सुरू केलेली खरेदी, लॉकडाउनमुळे आलेल्या अडचणी, पोर्टल-सर्व्हर डाउनने खरेदी केंद्रांकडून मिळत नसलेला प्रतिसाद यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात मका शिल्लक आहे, अशा अडचणी खासदार रक्षा खडसेंनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या. राज्य सरकारकडून त्यासंबंधी प्रस्ताव केंद्राकडे प्राप्त नसल्याचेही यावेळी समोर आले.
आठवडाभरात पुन्हा खरेदी -
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी होण्याबाबत शासकीय मका खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून तत्काळ केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी विनंती रक्षा खडसेंनी अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना केली होती. त्यानुसार राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला असता, केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळून मका खरेदी पुढच्या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहे.
हेही वाचा - भंडारा : रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश