जळगाव - जिल्ह्यातील एका शासकीय महिला वसतिगृहातील कथित अत्याचाराचे प्रकरण समोर आले होते. मात्र, या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. हे अतिशय चुकीचे आहे. मुळात हे सारे कथित प्रकरण असल्याने त्याच्या चौकशीत काहीही समोर आले नाही. असे असले तरी राज्यभर नव्हे तर देशभरात जळगावची बदनामी झाली. यापुढे विरोधकांनी शहानिशा न करता आरोप-प्रत्यारोप करणे थांबवावे, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांसह विविध महिला संघटनांच्या वतीने याच विषयासंदर्भात गुरुवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
काय आहे निवेदन? -
जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगावात असलेल्या एका शासकीय महिला वसतिगृहात कथित अत्याचाराचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर या विषयाबाबत विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी थेट विधिमंडळात मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका केली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चित्रा वाघ, महाले यांनी या प्रकरणाची विश्वासार्हता तसेच वस्तुस्थिती न तपासता अत्यंत घाईघाईने विधाने केली. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीत असे काहीही घडले नसल्याचे स्पष्ट झाले. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे जळगावची बदनामी झाली. मुळात या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी आमचीही भूमिका राहिली. जर या प्रकरणात खरोखर एखाद्या महिलेवर अन्याय, अत्याचार झाला असेल तर आम्ही आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावर उतरू. मात्र, विरोधकांनी आरोप-प्रत्यारोप करणे थांबवावे, असे निवेदनात नमूद केले आहे.
यांची होती उपस्थिती -
जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी शिवसेनेच्या सरिता माळी, मंगला बारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सपना तिवारी, उज्ज्वला शिंदे, लता पाटील, चित्रा देवरे, जुलेखा शाह आदींची उपस्थिती होती.