जळगाव - शहरातील दोन भावंडांनी आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. सन्मुख (वय 19) व गौरी गणेश महाजन (वय 14) अशी सुवर्णपदक विजेत्या स्पर्धकांची नावे आहेत. या दोघांनी सप्टेंबर महिन्यात नेपाळ देशातील पोखरा येथे झालेल्या 'इंडो-नेपाळ इन्व्हीटेशनल इंटरनॅशनल चॅम्पियनशीप 2020-21' या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत आपली छाप पाडली. सन्मुख व गौरीच्या चमकदार कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
- जगभरातून 39 स्पर्धक झाले होते सहभागी -
पंजाब राज्यातील अमृतसर येथे ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील योगा स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत भारतातील 65 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या 19 स्पर्धकांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड झाली होती. जळगावातील सन्मुख व गौरी महाजन या भावंडांचा यात समावेश होता. नेपाळमधील पोखरा येथील कासकीच्या रंगशाळा स्टेडियममध्ये 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान ही आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धा पार पडली. जगभरातील 39 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. भारताच्या 19 स्पर्धकांनी 13 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके मिळवली. सन्मुख व गौरीने यातील 2 सुवर्णपदके पटकावली.
- जळगावच्या लौकिकात भर -
सन्मुख व गौरी हिने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे जळगावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले असून, शहराच्या लौकिकातही भर पडली आहे. सन्मुख हा पुण्यातील आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इंजिनियरींग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे, तर गौरी ही जळगावातील प. न. लुंकड कन्या शाळेत इयत्ता नववीत शिकत आहे. सन्मुख याने 19 वर्षाच्या आतील गटात तर गौरीने 14 वर्षाखालील वयोगटातून सुवर्णपदक प्राप्त केले. दोघांना डॉक्टर के जुमानी यांच्यासह वडील गणेश महाजन व आई भाग्यश्री महाजन यांनी मार्गदर्शन केले.
- अशी लागली दोघांना योगा व जिम्नॅस्टिकची गोडी -
सन्मुख व गौरीचे वडील गणेश महाजन हे जळगावातील ला. ना. शाळेत शिक्षक आहेत. लहानपणी ते सन्मुखला सर्कस पाहायला नेत असत. यावेळी सर्कशीत दाखवले जाणारे जिम्नॅस्टिकचे प्रकार पाहून सन्मुखला विशेष कौतुक वाटायचे. तेथूनच त्याला जिम्नॅस्टिकची गोडी लागली. वडील गणेश हे देखील स्पोर्ट्समन असल्याने त्यांनी सन्मुखला पाठबळ दिले. पुढे इयत्ता 8 वीत असताना त्याने शालेय स्तरापासून ते जिल्हा, राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली. त्याने आपली बहीण गौरीला देखील जिम्नॅस्टिक वळण्यास प्रवृत्त केले. नंतर दोघेही योगा शिकले. आता दोघे जण जिम्नॅस्टिक आणि योगामध्ये उत्तम सादरीकरण करतात. त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.
- गौरीला पहिल्याच स्पर्धेत नाकारली होती संधी... पण युक्ती शोधली आणि स्पर्धा गाजवली -
गौरीच्या यशाच्या आठवणींना उजाळा देताना गणेश महाजन यांनी सांगितले की, गौरी उत्तम जिम्नॅस्टिक आणि योगा करायला लागल्यावर 2015 मध्ये तिने एका राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. पण तेव्हा तिचे वय पूर्ण 12 वर्षे नव्हते. म्हणून 12 वर्षे वयोगटात तिला संधी नाकारण्यात आली. पण आम्ही एक युक्ती शोधली. वयाची 12 वर्षे पूर्ण नसली तरी महिला गटातून तिला स्पर्धेत उतरता येणार होते. कारण महिला गटात शून्य ते पुढे कितीही वयोगटातील महिला स्पर्धेत सहभागी होऊ शकते. महिला गटातून उतरल्याने तिला सादरीकरणाची संधी मिळाली. या स्पर्धेत गौरीने उत्तम कामगिरी करत राज्याचे प्रतिनिधित्व केले. सन्मुखने देखील 2012-13 पासून राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या. आता दोघेही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत, असेही गणेश महाजन यांनी सांगितले.
- आता लक्ष्य 'ऑलिम्पिक'चे!
सन्मुख आणि गौरीला ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे जिम्नॅस्टिकमध्ये प्रतिनिधित्व करायचे आहे. दोघांना जिम्नॅस्टिक प्रकारात देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे आहे. त्या दृष्टीने शक्य ते प्रयत्न आणि मेहनत करायची त्यांची तयारी आहे. 'आजपर्यंत योगाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालेले नाही. भविष्यात ते मिळावे', अशी अपेक्षा गौरीने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
- महाजन कुटुंबाला लाभलाय खेळाचा वारसा -
सन्मुख आणि गौरी महाजन यांचे कुटुंब हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड या गावचे रहिवासी आहे. नोकरीच्या निमित्ताने महाजन कुटुंबीय जळगावात स्थायिक झाले. सन्मुख व गौरीचे आजोबा हे देखील शिक्षक होते. त्यांच्यानंतर वडील गणेश महाजन यांची दुसरी पिढी जळगावात वास्तव्याला आहे. महाजन कुटुंबाला खेळाचा वारसा लाभला आहे. सन्मुख व गौरीचे वडील गणेश महाजन हे युनिव्हर्सिटी प्लेयर आहेत. त्यांनी बास्केटबॉल व हँडबॉलमध्ये पुणे व औरंगाबाद विद्यापीठांकडून खेळत, राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. क्रीडा शिक्षक असल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना खेळासाठी पाठबळ दिले आहे. आजोबा दामोदर मोतीराम महाजन, आत्या सोनाली महाजन, काका संजय महाजन हे देखील स्पोर्ट्समन आहेत.
हेही वाचा - अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहोचवा आणि मिळवा 5000 रुपये; केंद्र सरकारची नवी योजना
हेही वाचा - डासांना पळवून लावण्यासाठी 'या' वनस्पती ठरू शकतात फायदेशीर