जळगाव - कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन आणि आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांना मनस्ताप सहन करावा लागला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातल्याने रोहित पवारांना कार्यक्रम आटोपता घेऊन तेथून काढता पाय घ्यावा लागला. कार्यकर्त्यांची रेटारेटी, घोषणाबाजी अन बेशिस्त वर्तन पाहून पवारांनी डोक्याला हात मारून घेतला.
साडेतीन तास उशिराने दाखल झाले पवार -
रोहित पवार हे तब्बल साडेतीन तास उशिराने जळगावातील पक्ष कार्यालयात दाखल झाले. याठिकाणी त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची वेळ ही दुपारी तीन वाजेची होती. परंतु, ते उशीर झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी ताटकळत बसले. सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ते कार्यालयात दाखल झाले. तेव्हा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. काही युवा कार्यकर्ते थेट व्यासपीठाजवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागले. अशात रेटारेटी होऊन प्रचंड गोंधळ उडाला. पवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी अनेक जण थेट व्यासपीठाजवळ आल्याने गोंधळात भर पडली.
थेट भाषणाला केली सुरुवात -
कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याचे पाहून रोहित पवारांनी थेट माईकचा ताबा घेऊन भाषणाला सुरुवात केली. अवघ्या 5 मिनिटात त्यांनी भाषण आटोपले. त्यानंतर ते कार्यकर्त्यांना चुकवत कार्यालयाच्या मागच्या दरवाजाने कसेबसे बाहेर पडले.
अर्णब गोस्वामीच्या अटकेची भाजपने मागणी करावी -
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्यभर युवा वर्गाच्या हाती सत्तेची सूत्रे गेली आहेत. यापुढे आपण सर्व जण एकत्र आलो, तर पुढील निवडणुकांमध्ये निश्चितच चित्र बदलेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती पुढे पाठवू नये. काही विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून संविधानाच्या विरोधात माहिती पाठवू शकतात. देशाच्या सुरक्षेला बाजूला ठेऊन एखाद्या पत्रकाराला माहिती पुरवणे, ती पण तीन दिवस आधी देणे चुकीचे आहे. तो फक्त भाजपच्या बाजूने बोलत असेल म्हणून अशी माहिती देणे योग्य नाही. अशा प्रकारे केंद्र सरकारकडून आपल्या सर्वांची सुरक्षा धोक्यात येत असेल, तर आपण सर्वांनी त्याच्यावर कारवाईची केंद्राकडे मागणी करायला हवी. भाजपने स्वतः अर्णब गोस्वामीच्या अटकेची मागणी करायला हवी, असेही रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा - परभणीत 'राष्ट्रवादी काँग्रेस' सर्वात मोठा पक्ष; पालकमंत्री नवाब मलिकांचा दावा