जळगाव - नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी येणारा कानबाई मातेचा उत्सव जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. रविवारी सायंकाळी विधीवत प्रतिष्ठापना केल्यानंतर रात्री जागरण गोंधळ घालत आज सोमवारी सकाळी भावपूर्ण वातावरणात कुलस्वामिनी असलेल्या कानबाई मातेला निरोप देण्यात आला.
दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे आणि खान्देशातील जनतेचे अतूट नाते आहे. वर्षानुवर्षे हा उत्सव अविरतपणे साजरा होत आहे. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी एक पाटावर कानबाई मातेची प्रतिष्ठापना केली जाते.
पितळी किंवा लाकडी मुखवट्याची पाटावर मांडणी केली जाते. त्याला हिरव्या रंगाची साडी परिधान करून विविध अलंकार घातले जातात. याच मूर्तीला कानबाई संबोधले जाते. त्यानंतर रोट पूजन केले जाते. आदल्या दिवशी ७ प्रकारचे धान्य एकत्र दळून त्याच्या भाकरी आणि रानभाजी याचा नैवेद्य रोट म्हणून दाखवला जातो.
कानबाई मातेची प्रतिष्ठापना झाल्यावर जागरणच्या दिवशी पुरणपोळी आणि खिरचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी कानबाई मातेला वाजतगाजत निरोप दिला जातो. यावेळी स्वरचित गाणी, फुगड्या खेळून कानबाई मातेचा गजर केला जातो. आबालवृद्धांना हा सण आपुलकीची शिकवण देऊन जातो.
संपूर्ण महाराष्ट्रात खान्देशाव्यतिरिक्त अन्य कोठेही हा लोकोत्सव साजरा होत नाही. कानबाई माता ही खान्देशात वास्तव्य करणाऱ्या ब्राह्मण, वाणी, शिंपी, मराठे, लोहार, सोनार, सुतार, नाभिक तसेच माळी समाजबांधवांची कुलदैवत मानली जाते. या उत्सवानिमित्ताने भाऊबंदकीतील सर्वजण मतभेद, वादविवाद विसरून एकत्र येतात. एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारा हा लोकोत्सव आहे.