जळगाव - मद्यधुंद अवस्थेत आईच्या प्रियकराने पोटावर लाथ मारल्याने एका ४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना सोमवारी जळगाव शहरात घडली. महेश कैलास माळी (वय ४, रा. यशोदानगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी कैलास माळी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आहे. महेशच्या आईने त्याच्या खऱ्या बापाचे नाव बदलून आरोपीचे नाव दिले होते.
महेशची आई आशा कैलास माळी ही गेल्या वर्षी जळगाव शहरातील यशोदानगरात राहण्यासाठी आली होती. आशा माळी हिचा विवाह जामनेर तालुक्यातील पहूर येथील अशोक जाधव याच्याशी झाला होता. मात्र, दोघांचा काडीमोड झाल्यानंतर ती कैलास माळी याच्यासोबत राहत होती. कैलास माळी हा देखील विवाहीत असून तो जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी गावात राहतो. दरम्यान, कैलास यानेच आशा व तिच्या मुलांना जळगावात भाड्याने घर घेऊन दिले होते.
तो आठवड्यातून दोन-तीन दिवस जळगावात येऊन त्यांच्यासोबत राहत होता. तसेच आशा व तिच्या मुलांच्या पालन-पोषणाचा खर्चदेखील करीत होता. सोमवारी दुपारी २ वाजता तो दारू पिऊन आशाच्या घरी आला. किराणा सामान आणण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर तो घरातून निघून गेला. काही वेळाने तो पुन्हा घरी आला. त्याने पुन्हा आशा सोबत वाद घालण्यास सुरूवात केली. याचवेळी कैलासने महेशला शिवीगाळ करत त्याच्या पोटावर जोरात लाथ मारली. त्यामुळे महेश बेशुद्ध पडला. या प्रकारानंतर आशाने आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.
नागरिकांनी खडसावल्याने कैलास याने महेशला बेशुद्ध अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच महेशचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर कैलासने रुग्णालयातून पळ काढला. या घटनेची माहिती झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश वावरे, अतुल वंजारी यांनी रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेतली. दरम्यान, कैलास याचाही शोध घेतला. परंतु, तो मिळाला नाही. शवविच्छेदन करुन महेशचा मृतदेह आशा हिच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे आशाने रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. आशाला तीन मुली आहेत. महेश हा तिचा सर्वात लहान मुलगा होता. या प्रकरणी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.