जळगाव - विमानतळ परिसरात मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुख्य धावपट्टीलगत बिबट्याचे दर्शन झाल्याने विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर अनेकवेळा दिसून आला असला, तरी मंगळवारी धावपट्टीलगतच बिबट्या दिसून आला. विमानसेवा सुरु असल्याने तत्काळ विमानतळावरील अधिकाऱ्यांनी बिबट्याबाबतची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर, दुपारी ३ वाजेपासून वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम आखली. रात्री उशीरापर्यंत बिबट्याला जेरबंद करण्याचे काम सुरु होते.
विमानतळ परिसरात नेहमी बिबट्याचे दर्शन होत असते. मात्र, काही महिन्यांपुर्वी वनविभागाने विमानतळ परिसरातील अनेक प्राणी हुसकावून लावले होते. त्यामुळे काही महिन्यांपासून विमानतळ परिसरात बिबट्याचे दर्शन झाले नव्हते. तसेच, विमानतळ परिसरात संरक्षण भिंतीचे देखील काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारी भरदुपारी धावपट्टीलगतच बिबट्याचे दर्शन याठिकाणी नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना झाले. धावपट्टीलगत बिबट्या दिसल्याने सुरक्षा रक्षकांनी याबाबतची माहिती मुख्य अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनीही तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून बिबट्याबाबतची माहिती दिली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास वनविभागाचे पथक देखील विमानतळ परिसरात दाखल झाले.
धावपट्टीच्या बाजुला असलेल्या गटारीत बिबट्या फसला..
पाण्याचा शोधात हा बिबट्या विमानतळ परिसरात दाखल झाल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कारण बिबट्या धावपट्टीवरून थेट परिसरात असलेल्या मोठ्या गटारीत जावून बसला. वनविभागाचे अधिकारी आल्यानंतरही बिबट्या गटारीतच असल्याने गटारीच्या दोन्ही बाजूस वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाळे लावले. यामुळे बिबट्याला याठिकाणाहून जाण्याचा दुसरा मार्ग शिल्लक नव्हता. मात्र, रात्री उशीरापर्यंत हा बिबट्या गटारीतच अडकला होता. वनविभागाकडून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरुच होते.
"विमानतळ परिसरात बिबट्या आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी पथक पाठविण्यात आले आहे. मात्र, रात्री उशीरापर्यंत बिबट्याला जेरबंद करता आले नव्हते. वनविभागाचे पथक त्याच ठिकाणी थांबून होते."
-दिगंबर पगार, मुख्य उपवनसंरक्षक, जळगाव वनविभाग
हेही वाचा : थरारक! बुलडाण्यात बिबट्याच्या हल्ल्यात ८ जण जखमी; पाहा व्हिडिओ