जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील हुतात्मा जवान यश देशमुख यांचे पार्थिव आज सकाळी नाशिक येथून मूळगावी येणार आहे. लष्कराची गार्ड टीम त्यांचे पार्थिव आणणार आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास यश यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. गुरुवारी दुपारी जम्मू काश्मिरातील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात यश देशमुख यांना वीरमरण आले होते.
यश यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. यश यांच्या अशा जाण्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. यश यांच्या हौताम्याची बातमी धडकल्यानंतर पिंपळगावातील एकाही घरात चूल पेटलेली नाही. सीमेवर लढणाऱ्या जवानांचा हकनाक बळी घेणाऱ्या अतिरेक्यांचा केंद्र सरकारने कायमस्वरुपी बिमोड करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमधून हाेत आहे.
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी वीरमरण -
यश देशमुख यांचा जन्म ६ एप्रिल १९९९ रोजी झालेला होता. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने ते आधीपासूनच मेहनती होते. लहानपणापासून लष्करी सेवेचे त्यांना आकर्षक होते. मोठे झाल्यावर सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे त्यांचे ध्येय होते. मात्र, सैन्यात दाखल झाल्यानंतर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांना वीरमरण आले. आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात ते सर्वांना सोडून गेले.
सजवलेल्या ट्रॅक्टरवरून निघणार अंत्ययात्रा -
हुतात्मा जवान यश देशमुख यांचे मित्र, गावातील तरुण व ग्रामस्थ मनावर दगड ठेऊन आपल्या दुःखाला आवर घालत सुपूत्राला अखेरचा निरोप देण्याच्या तयारीत लागल्याचे दिसून आले. यश यांच्या मित्र परिवाराला त्यांच्या निधनाची बातमीने मोठा धक्का बसला आहे. काही मित्रांनी यश यांच्या आठवणींना उजाळा दिला. पिंपळगावसह चाळीसगाव तालुक्यात ठिकठिकाणी यश देशमुख यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले आहेत. अंत्यसंस्काराप्रसंगी तब्बल ४० क्विंटल झेंडुची फुले व २ क्विंटल रांगाेळी मागवण्यात आली आहे. सजवलेल्या ट्रॅक्टरवरून जवानाचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे. गावात प्रत्येक घरासमोर रांगोळ्या टाकण्यात येणार आहेत.
हेही वाचा : यश देशमुख यांना हौतात्म्य आल्याने पिंपळगाव बुडाले शोकसागरात; गावात पेटली नाही एकही चूल!