ETV Bharat / state

आता एकनाथ खडसेंच्या पत्नीही ईडीच्या रडारवर; जाणून घ्या मंदाकिनी खडसेंचा राजकीय प्रवास

ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. तर एकनाथ खडसे यांची दुसऱ्यांदा कसून चौकशी केली. आता खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांनाही ईडीने चौकशीचे समन्स जारी केले आहे.

author img

By

Published : Jul 21, 2021, 9:00 PM IST

मंदाकिनी खडसे
मंदाकिनी खडसे

जळगाव - पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीमंत्री एकनाथ खडसे व त्यांचे कुटुंबीय सध्या चांगलेच अडचणीत आले आहे. या प्रकरणात ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. तर एकनाथ खडसे यांची दुसऱ्यांदा कसून चौकशी केली. आता खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांनाही ईडीने चौकशीचे समन्स जारी केले आहे. दरम्यान, ईडीसमोर हजर होण्यासाठी त्यांनी वेळ मागून घेतला आहे. भोसरीच्या भूखंड प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मंदाकिनी खडसे या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासाचा 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

भोसरी प्रकरणामुळे प्रकाशझोतात आल्या मंदाकिनी खडसे-

2016 मध्ये एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. या प्रकरणामुळे मंदाकिनी खडसे प्रकाशझोतात आल्या. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप होता. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना उकानी नामक व्यक्तीकडून खरेदी केला होता. पुण्याच्या उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँपड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात 30 मे 2016 ला तक्रार दाखल केली होती. गावंडे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी पुढील कारवाई न केल्याने गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने गावंडे यांच्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत विभागाला दिले होते. एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत विभागाने खडसे, त्यांची पत्नी, जावई आणि उकानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. तेव्हापासून मंदाकिनी खडसेंचे नाव, पती एकनाथ खडसे यांच्यासोबत माध्यमांतील भोसरीच्या प्रकरणाच्या ठळक बातम्यांमध्ये राहिले आहे.

मंदाकिनी खडसे यांच्याविषयी थोडेसे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी असलेल्या मंदाकिनी खडसे यांचे माहेर हे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुऱ्याचे. नांदुरा येथील मधुकर नारायण पाटील व रुखमाबाई पाटील यांच्या त्या सर्वात लहान कन्या. त्यांचे संपूर्ण बालपण आई-वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणींसोबत नांदुऱ्यातच गेले. मंदाकिनी खडसे यांची एक बहीण जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे दिलेली होती. तसेच एकनाथ खडसे यांचीही एक बहीण नांदुऱ्याला दिलेली होती. या नातेसंबंधाच्या माध्यमातून 12 एप्रिल 1977 मध्ये त्यांचे एकनाथ खडसेंसोबत लग्न झाले. पुढे एकनाथ खडसे हे राजकारणात सक्रिय झाले. मात्र, मंदाकिनी खडसे या राजकारणापासून दूर होत्या. कोथळीत असताना 2004 मध्ये मंदाकिनी खडसेंनी स्वतः पुढाकार घेऊन गावात महिलांसाठी 'मुक्ताई डेअरी' नावाने दूध डेअरी स्थापन केली होती. डेअरीच्या स्थापनेपासून अनेक वर्षे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळले. त्यानंतर 2013-14 मध्ये जळगाव जिल्हा दूध संघावरील ताबा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच एनडीडीबीने सोडल्याने दूध संघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली. या निवडणुकीसाठी कोथळीच्या मुक्ताई दूध विकास सोसायटीकडून मंदाकिनी खडसे यांच्या नावाचा ठराव देण्यात आला. या निवडणुकीत त्या निवडून आल्या. तेव्हा जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. त्यांनी संमती दिल्याने 20 ऑगस्ट 2015 रोजी त्यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. ही जबाबदारी सांभाळत असताना मुंबईच्या महानंद दूध संघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे चालून आले. सहकार क्षेत्रातील या मर्यादित प्रवासाव्यतिरिक्त मंदाकिनी खडसे दुसरीकडे सक्रिय नाहीत.

उत्तर महाराष्ट्रात भुजबळ यांच्यानंतर खडसे घेऱ्यात-

उत्तर महाराष्ट्रातील वजनदार मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आता माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांच्या मानगुटीवर ईडीचे भूत बसले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन, अंधेरीतील आरटीओ कार्यालयाची इमारत तसेच मलबारमधील गेस्ट हाऊस बांधकामाचे कंत्राट देताना नियम धाब्यावर बसवून, त्या माध्यमातून काळा पैसा बाळगल्याच्या संशयावरून छगन भुजबळ यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. त्यात भुजबळ कुटुंबीयांसह अन्य 14 जणांची नावे होती. भुजबळ यातून कसेबसे बाहेर सुटले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरूच आहे. मार्च 2016 मधले हे प्रकरण आहे. त्याचवेळी इकडे एकनाथ खडसे यांच्यावरही अशाच प्रकारचे विविध आरोप होऊ लागले होते. त्यापैकी पिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरण खडसेंच्या मानगुटीवर अखेर बसलेच. यात खडसेंचे जावई गिरीश चौधरी आणि पत्नी मंदाकिनी खडसे यांनी भागीदारीत भोसरीचा भूखंड खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. 3 कोटी 75 लाखांत खरेदी केलेल्या या भूखंडासाठी देण्यात आलेली रक्कम बंद असलेल्या कंपन्यांच्या खात्यातून वर्ग झाल्याचे बोलले जाते. याच व्यावहारिक संशयावरून खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची चौकशी ईडीने सुरू केली असून, चौधरी सध्या अटकेत आहेत. आता खडसेंची पत्नी मंदाकिनी या ईडीच्या रडारवर आहेत. दरम्यान, खडसेंची देखील याप्रकरणी चौकशी सुरू आहे. खडसे जोपर्यंत भाजपात होते, तोपर्यंत ईडीची कारवाई सौम्य पद्धतीने सुरू होती. मात्र, खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर कारवाईने वेग पकडला आहे. भुजबळ कुटुंबीयांप्रमाणे ईडीने खडसे कुटुंबीयांचीदेखील झोप उडवली आहे. ईडीच्या फेऱ्यात खडसे आणि त्यांचे कुटुंब पुरते फसल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.